esakal | मुलींनो...सावधान! व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील फोटो थेट मॅट्रीमोनी वेबसाईटवर
sakal

बोलून बातमी शोधा

विवाह नोंदणी

मुलींनो...सावधान! व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुकवरील फोटो थेट मॅट्रीमोनी वेबसाईटवर

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मुलींनो जर तुम्ही फेसबुकवर प्रोफाईल (facebook profile) फोटो आणि व्हॉट्सॲपवर डीपी (whatsapp dp) ठेवत असाल तर आजच सावध व्हा. कारण शेकडो विवाह नोंदणी संकेतस्थळावर (matrimony websites) तुमचा फोटो उपवर युवती म्हणून वापरला जात असल्याची शक्यता आहेत. तुमचे फोटो वापरून राज्यातील शेकडो बनावट मॅट्रीमोनी वेबसाईट्स लाखो रुपये कमविण्याचा गोरखधंदा करत आहेत. नुकताच एका बोगस मॅट्रीमोनी टोळीची (fake matrimony website) सायबर पोलिसांनी भंडाफोड केला आहे. (criminals use whatsapp and facebook photo of woman on matrimony websites)

हेही वाचा: मित्राच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न; वृद्धाचे कृत्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विवाहोच्छुक युवक-युवती योग्य जोडीदार निवडण्यासाठी मॅट्रीमोनी साईट्सवर प्रोफाइल बनवतात. त्या माध्यमातून जोडीदार शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र, राज्यात शेकडो बनावट विवाह नोंदणी संस्था कार्यरत असून याद्वारे अनेकांना लाखोंनी गंडा घालण्याचे काम जोरात सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी विवाह नोंदणी संस्था स्थापन करण्यात आल्या असून नोंदणी शुल्काच्या नावावर फसवणूक करतात. काही संस्था केवळ फसवणूक करण्यासाठीच स्थापन करण्यात आल्या आहेत. बंद असलेल्या फ्लॅटमध्ये या संस्थांचा गोरखधंदा चालतो. संस्थेत जवळपास १५ ते २० तरुणी नोकरीवर ठेवल्या जातात. त्यांना केवळ टेलिकॉलींग करून उपवर युवती किंवा युवकांसोबत बोलायचे असते. दुसरी एक टीम फेसबुक, ट्विटर, वॉट्सॲप डीपी आणि इंस्टाग्रामवरून सुंदर-सुंदर मुलींचे फोटो कॉपी करण्याचे काम करते.

पैसे भरल्यानंतर थेट मुलींचे फोटो -

फेसबुकवरून कॉपी केलेल्या मुलींचे अनेक फोटो युवकांना वॉट्सॲपवर पाठविले जातात. मुलगी पसंत पडल्यानंतर नोंदणी शुल्काच्या नावाखाली १० ते १५ हजार रुपये उकळले जातात. त्यानंतर फोटो पाठविलेल्या मुलीच्याऐवजी संस्थेत काम करणाऱ्या मुलींना फोनवरून संपर्क साधण्यास सांगतात. प्रोफाइल आवडल्याचे सांगून युवकांकडून भेटवस्तू किंवा पैसेही त्या मुली उकळतात.

प्रोफाइल करा लॉक -

मुलींनी फेसबुकवर स्वतःचे प्रोफाइल फोटो ठेवू नये. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. तसेच प्रोफाइल लॉक करून ठेवावी. तसेच व्हॉट्सॲपर डीपी ठेवताना ‘ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ या सेटिंगचा वापर करावा. जेणेकरून कुणीही आपला प्रोफाइल फोटो किंवा व्हॉट्सॲप डीपी कॉपी करणार नाही.

व्हॉट्सॲपवरून बायोडाटांची चोरी -

विवाह संस्थेची नोंदणी करून हे रॅकेट सेवा शुल्काच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या सोशल व्हाटसअ‍ॅप ग्रुप तयार करतात. अनेकांनी लिंक पाठवून मुलीचा बायोडाटा पाठविण्याची विनंती करतात. मुलीचा फोटो आणि मोबाईल नंबर मिळवून थेट संपर्क साधून बोलणी करतात. लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळतात.

हे करू नका -

  • पालकांनी उपवर मुलींचे परस्पर फोटो कुणालाही पाठवू नये

  • पालकांनी मुलीचा क्रमांक न देता स्वतःचा क्रमांक द्यावा

  • फोनवर सर्व माहिती पुरवू नका

  • सोशल मीडियावरील माहितीवर विश्‍वास ठेवू नका

  • मुलीचा बायोडाटा उठसूट कुणालाही पाठवू नका

अनेक बोगस विवाह संकेतस्थळे असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे पालक आणि उपवर युवक आणि युवतींनी सतर्क व्हावे. संकेतस्थळावर नोंदणी करताना वेबसाइट प्रोटेक्टेड आहे किंवा नाही हेसुद्धा बघावे. मुलामुलींनी केवळ फोनवरील माहितीवर विश्‍वास न ठेवता पालकांशी चर्चा करून लग्नाबाबत निर्णय घ्यावे. अनेक सायबर क्रिमिनल्ससुद्धा अशा माहितींचा गैरवापर करू शकतात.
- केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम, नागपूर पोलिस
loading image
go to top