Nagpur : नागपूर शहरात जमावबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Police Commissioner Amitesh Kumar

नागपूर शहरात जमावबंदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अमरावती शहरातील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीची भूमिका घेत पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी कायदा लागू केला आहे. त्यानुसार आजपासून शहरात पाच जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम १४४ (१) नुसार कारवाईचा धडाका सुरू होणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

त्रिपुरा राज्यात काही संघटनांकडून मुस्लिम धर्मगुरूंबाबत आपत्तीजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात रझा अकादमी आणि इस्लामिक ऑर्गनायझेशन अलहज मोहम्मद सैय्यद नुरी या संघटनांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या बंददरम्यान नांदेड, अमरावती, मालेगाव, फुसाड आणि कारंजा या ठिकाणी दगडफेक व जाळपोळ सारख्या घटना उघडकीस आल्या होत्या. १३ नोव्हेंबरला अमरावती शहरात हिंसक घटना घडल्याचे पडसाद अन्य शहरातही उमटत आहेत. त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्ती अश्‍वती दोरजे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जमावबंदी कायदा लागू केला आहे. वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कारणांशिवाय पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकाच ठिकाणी आढळल्यास त्यांना थेट कोठडीत डांबण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील ३१ संवेदनशील ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून, या भागात सशस्त्र पोलिस गस्त घालत आहेत. नऊ पोलिस उपायुक्तांशिवाय सुमारे पाच हजार पोलिसांचा ताफा बंदोबस्तात तैनात करण्यात आला. गुन्हेगारांची धरपकड सुरू करण्यात आली असून, वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी सुमारे १२७ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.

समाजमाध्यमांद्वारे अफवा पसरण्याची शक्यता लक्षात घेता सायबर पोलिसांनाही अधिक सतर्क करण्यात आले आहे. शहरातील व्हॉट्सॲप ग्रुपची संपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा केली असून, त्यापैकी संवेदनशील असणाऱ्या ग्रुपवर पोलिसांची करडी नजर आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांनी बारिक लक्ष ठेवले असून त्यासाठी अनेक व्हॉट्सॲपवरील ग्रूपवरही पोलिसांनी वॉच ठेवला आहे.

सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

शहरात पोलिस आणि नागरिकांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे शहरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. अफवांवर कुणीही विश्‍वास ठेवू नका. कोणत्याही व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्यास सुज्ञ नागरिक या नात्याने लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला कळवा. शहरात जवळपास ३१ संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस विभाग सतर्क असून सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

loading image
go to top