esakal | पाचशे रुपयांच्या थर्माससाठी गमावले पाच लाख, एका अॅपने केला घात
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

पाचशे रुपयांच्या थर्माससाठी गमावले पाच लाख, एका अॅपने केला घात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वेच्या लोकोपायलट पदावर नोकरी करणाऱ्या व्यक्तीने ॲमेझॉनवरून पाचशे रुपयांचा थर्मास ऑर्डर केला. परंतु, आवडला नसल्याने ऑर्डर रद्द केली. पैसे परत मिळावे म्हणून त्यांनी कस्टमर केअरला फोन केला असता सायबर गुन्हेगाराने (cyber crime nagpur) त्यांना हेरले. पैसे परत तर मिळालेच नाही परंतु त्यांच्याच खात्यातून तब्बल पाच लाख रुपये लंपास झाले. (cyber fraud of five lakh with man in nagpur)

हेही वाचा: 'पंकजा मुंडे पुढच्याही जन्मी भाजपच्याच सदस्य'

पोलिसांच्या माहितीनुसार, विज्ञान प्यारेलाल मेश्राम (५३. रा.शेंडेनगर, टेकानाका) हे रेल्वेत लोको पायलट पदावर कार्यरत आहेत. त्यांनी १८ जुलैला ॲमेझॉनवरून एक थर्मास ऑर्डर केला. थर्मासची रक्कमही त्यांनी ट्रान्सफर केली. काही वेळातच त्यांनी थर्मास न आवडल्याने ऑर्डर रद्द केली. परंतु, त्यांना पैसे रिफंड झाले नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवर ॲमेझॉन कस्टमर केअरचा फोन नंबर शोधला आणि फोन केला. तो क्रमांक थेट सायबर गुन्हेगाराचा होता. मेश्राम यांनी ऑर्डर रद्द केल्याचे सांगून पैसे रिफंड करण्यास सांगितले. आरोपीने त्यांना पैसे परत करण्याची हमी दिली. त्यांना मोबाईलमध्ये ‘एनी डेस्क’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. मेश्राम यांनी लगेच ॲप डाऊनलोड करीत कस्टमर केअर अधिकाऱ्याला पासवर्ड दिला. त्यानंतर काही वेळातच मेश्राम यांच्या खात्‍यातून पैसे ट्रान्सफर व्हायला लागले. त्यांच्या लक्षात येईपर्यंत बॅंक खात्यातून ५ लाख २५० रुपये काढले. मेश्राम यांना काहीच सूचत नव्हते. त्यांनी कपिलनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून सायबर गुन्हेगाराविरूद्ध गुन्हा दाखल केला.

कसे काम करते ॲप -

मोबाईलमधील गूगल प्ले स्टोअरमधून हे ॲप कोणीही सहज डाऊनलोड करू शकतो. या ॲपच्या माध्यमातून कोणीही दुसऱ्या व्यक्तीचा मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर बसल्या जागेवरुन हाताळू शकतात. मोबाइल किंवा कॉम्प्युटरची संपूर्ण माहिती दुसऱ्याला दिसते. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या या अ‍ॅपचा कोड दुसऱ्याला दिला असेल. त्यामुळे हे अ‍ॅप एक तर वापरू नका किंवा फक्त ओळखीच्या व्यक्तीला आपल्या मोबइल, लॅपटॉप मधील अडचणी सोडविण्यासाठी सांगा. अन्यथा मोठ्या अडचणीत सापडाल.

loading image