esakal | दहेगाव येथे चक्क तलावात देवीची मूर्ती; भाविकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Dahegaon Devi Idol

दहेगाव येथे चक्क तलावात देवीची मूर्ती; भाविकांची गर्दी

sakal_logo
By
राम वाडीभस्मे

धानला (जि. नागपूर) - मौदा तालुक्यातील दहेगाव हे येथील देवीची मुर्ती सर्वांचे आकर्षणाचे केंद्र झाली आहे. दहेगाव येथे तलावाच्या आत स्थापन केलेल्या मुर्तीचे दर्शन घ्यायला दूरदुरुन भाविक येत आहेत.

दहेगाव येथील काही युवकांच्या डोक्यात तलावात मुर्ती स्थापनेची कल्पना आली. समोरच काही दिवसावर आलेल्या घटस्थापने व नवरात्रीच्या कार्यक्रमाविषयी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. गावातील तलावात दुर्गादेवीची मूर्ती स्थापण्याच्या कल्पनेला इतरांनी उचलून धरले. तलावात माणूसभर पाणी असल्यामुळे स्टेज कसा करायचा, हा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा राहिला.

त्यातल्या त्यात रस्ता निर्माण करणे हीसुद्धा समस्याच होती. त्यांनी धान शेतीत चिखल करण्याकरिता ट्रॅक्टरच्या सोबत लावण्यात येत असलेले साहित्य गावातून मोठ्या प्रमाणात गोळा करून त्यांना एकदुसऱ्यावर नटबोल्टच्या सहाय्याने ठेवत पाट्या ठोकून त्यावर स्टेज व काठापासून आतमध्ये ५० फुट दूरपर्यंत रस्ता तयार केला. १४ ऑक्टोबर २००४ साली सर्वप्रथम देवीच्या मूर्तीची तलावात स्थापना करण्यात आली. गेल्या १७ वर्षांपासून ही प्रथा सातत्याने सुरू आहे.

हेही वाचा: पोटच्या मुलीशी गैरवर्तन; बापाचे कृत्य वाचून बसेल धक्का

हळूहळू तलावातील या देवीच्या मंदिराच्या कलाकृतीची परिसरात चर्चा होऊ लागली. भाविकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे काठावरून मूर्ती मांडण्याचे ठिकाण हे ५० फुटावरून १०५ फुटाच्या आत करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षापासून येथे दिवसाला जवळपास १५००० भाविक यायचे. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची महामारीपासून बचावण्यासाठी निर्बंधाचे पालन करुन घटस्थापना करून अखंडितपणे ही प्रथा सुरूच आहे.

सद्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने व शासनाने निर्बंध शिथिल केल्याने यावर्षी सुद्धा मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या सतरा वर्षाच्या काळात येथे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. नवयुवक मंडळाच्या माध्यमातून गावातील तरुण मंडळी स्वयंसेवी म्हणून सेवा देत असतात.

loading image
go to top