Nagpur : जनावरांपासून शेतपिकांचे नुकसान ; पालकमंत्री सुनील केदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील केदार

जनावरांपासून शेतपिकांचे नुकसान : पालकमंत्री सुनील केदार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जेजे करणे आवश्यक आहे, त्या सर्व बाबी करण्यास शासनाची तयारी आहे. आजही मोठ्या प्रमाणात जंगली जणावरांपासून शेतपिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी तसेच जंगली जनावरांना शेतपिकांपासून दूर ठेवण्यासाठी एक चांगला कार्यक्रम आणू, असे आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.

कारंजा तालुक्यातील पिपरी लिंगा येथील ग्रामपंचायत भवन बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कारंजा व आर्वी तालुक्यातील विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद््घाटन झाले. यावेळी माजी आमदार अमर काळे, कारंजा पंचायत समितीचे सभापती चंद्रशेखर आत्राम, सरपंच चंदा घाडगे, उपसरपंच आशा घागरे, कारंजा न.पं.चे माजी उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर, माजी पंस सदस्य जयसिंगराव घाडगे तसेच त्या त्या गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

शेतकऱ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी हिताची कोणतीही बाब माझ्यासमोर आल्यास ती तातडीने मंजूर करण्याकडे माझा कटाक्ष असतो. शेतकरी जगला तरच आपण जगू, असे पुढे बोलतांना पालकमंत्री सुनील केदार म्हणाले. जंगली जणावरांपासून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. ही समस्या सगळीकडेच आहे. यासाठी कायमस्वरूपी चांगला पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेती सर्वात जास्त रोजगार देणारा उद्योग आहे. त्यामुळे हा उद्योग वाढला पाहिजे, त्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे ते म्हणाले.

सावरडोह येथील रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलतांना ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाने उगवले नाही, अशा शेतकऱ्यांचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पुलाचे काम मंजूर करू, असे त्यांनी सांगितले.

विविध कामांचे लोकार्पण

पालकमंत्र्यांच्या हस्ते कारंजा तालुक्यातील पिपरी येथील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे लोकार्पण, १४ लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पिपरी लिंगा येथील ग्रामपंचायत भवन बांधकामाचे भूमिपूजन, ग्रामसडक योजनेंतर्गत लिंगा मांडवी ते पिपरी या एक कोटी चार लाख रुपये तर सावरडोह ते खापरी एक कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन झाले.

भुखंडधारकांना दिलासा देण्याचे निर्देश

आर्वी तालुक्यातील ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या एक कोटी १३ लाख खर्चाच्या मांडला येथील तसेच अहिरवाडा ते जुना अहिरवाडा येथील एक कोटी दोन लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. भाईपूर (वाठोडा) येथील रस्त्याच्या सिमारेषेतील भुखंडाची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. या भुखंडाबाबत संबंधित भूखंडधारक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून भुखंडधारकांना दिलासा मिळेल, असा पर्याय काढण्याचे निर्देश दिले.

loading image
go to top