गोरेवाड्यात आले दुर्मीळ डान्सिंग डियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्मीळ डान्सिंग डियर

गोरेवाड्यात आले दुर्मीळ डान्सिंग डियर

नागपूर : मणिपूरमध्ये आढळणाऱ्या एल्ड हरणांची स्थानिक आणि लुप्तप्राय उपप्रजाती संगाई (डान्सिंग डियर), खोकड आणि कोल्हा या नवीन पाहुण्यांचे बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आगमन झाले आहे. राज्यातील पर्यटकांना पहिल्यांदाच संगाई हा प्राणी पाहता येणार आहे. त्यामुळे मध्यभारतासह राज्यातील पर्यटकांचे हा प्राणी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब ठाकरे प्राणिसंग्रहालयात आणलेले वन्यप्राणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. यातील संगाई हा प्राणी प्रथम राज्यातील या प्राणिसंग्रहालयात आणला आहे. हा प्राणी प्रजातीतील सर्वात दुर्मिळ आहे. ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यात हे हरिण आढळते. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या करारानुसार वन्यप्राण्यांची अदलाबदल करण्यात येत आहे.

गोरेवाड्यातून वाघ आणि दोन अस्वल दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. यापूर्वीही गोरेवाडा प्राणी उद्यानात दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयातून काळवीट, पांढरे काळवीट, सांबर आणि भेकर हे प्राणी प्राप्त झाले आहेत. या प्राण्यांची वाहतूक आणि नियोजन प्राणिसंग्रहालयाचे जनरल क्युरेटर दीपक सावंत, पशुचिकित्सक डॉ. मयूर पावशे, राजू वालथरे यांनी केले. नवी दिल्ली येथील क्युरेटर सौरभ वशिष्ट आणि उद्यान सहसंचालक अनामिका यांचे सहकार्य मिळाले. या प्राण्यांच्या आरोग्याची काळजी प्राणी संग्रहालयाचे संचालक एच.वी. माडभूशी यांच्यासह प्रशिक्षण केंद्राचे डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. विनोद धूत घेत आहेत.

संगाई मणिपूरचा राज्यप्राणी

संगाई हा मणिपूर राज्याचा राज्यप्राणी आहे. संगाई हे जगातील सर्वात दुर्मिळ हरणाची प्रजाती असून यांची नैसर्गिक अधिवासातील एकूण संख्या ३०० पेक्षा कमी आहे. हे हरिण केवळ मणिपूर राज्यातील लोकटक तलावाच्या परिसरात आढळते. या प्राण्यांच्या संवर्धनासाठी या परिसरात किबुल-लामजाओ राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आले आहे.

Web Title: Dancing Deer Gorewada Manipur Animal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurManipurSakaldeer
go to top