विदर्भातील शिंदेसेनेची फौज जाणार मुंबईला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava Vidarbha

विदर्भातील शिंदेसेनेची फौज जाणार मुंबईला

नागपूर : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामार्फत मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. याकरिता विदर्भातून हजारो कार्यकर्ते जाणार असून नागपूर जिल्ह्यातून सुमारे एक हजार कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

प्रथमच शिवसेनेच्यावतीने एकाच दिवशी दोन मेळावे होणार आहे. मेळाव्यासाठी दोन्ही गटाने शिवाजी पार्कसाठी मोठी कसरत केली होती. न्यायालयीन लढाईत उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा दुप्पट गर्दी शिंदे गटाच्यावतीने बीकेसीवर जमा करून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. याकरिता संपूर्ण यंत्रणेला कामाला लावण्यात आले आहे. शिंदे गटाकडे ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. याशिवाय राज्यात सत्ता आहे आणि हाताशी मंत्रिसुद्धा आहेत. त्यामुळे गर्दी जमवणे शिंदे गटासाठी अवघड नाही.

शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांनी आम्हाला मुंबई येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. मात्र इतकेच कार्यकर्ते आणा, असे कुठलेही टार्गेट देण्यात आले नाही. बहुतांश कार्यकर्ते स्वेच्छेने जाणार आहेत. काही विमानाने, कोणी रेल्वेने तर काहीजण स्वतःच्या चारचाकी घेऊन मुंबईला जाणार आहेत. त्याचे नियोजन सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातून जवळपास हजार कार्यकर्ते जाण्यास इच्छूक असल्याचे संदीप इटकेलवार यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने आणि रामटेकेचे आमदार आशिष जयस्वाल शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याशिवाय किरण पांडव, मंगेश काशीकर यांच्यासह अनेक शिवसैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड हेसुद्धा मोठ्‍या प्रमाणात कार्यकर्त्यांची फौज दसरा मेळाव्याला रवाना करणार असल्याचे समजते.