
नागपूर : अंत्यविधीदरम्यान भाजलेल्या दोघांचा मृत्यू
कामठी : शहरातील राणी तलाव मोक्षधाम येथे गुरुवारी(ता.२८)एका मृतदेहावर अंत्यविधीदरम्यान मुखाग्नी देत असताना डिझेलचा भडका उडून तिघे गंभीररीत्या भाजले होते. या तिघांवर उपचार सुरु असताना शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला. भाजलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. दोघांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सुधीर महादेव डोंगरे (वय ४५) व दिलीप घनश्याम गजभिये (वय ६०) अशी मृतांची नावे आहेत.
राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यविधीदरम्यान पार्थिवाला मुखाग्नी देत असताना अचानक डिझेलचा भडका उडाल्याने डोंगरे व गजभिये यांच्यासह सुधाकर खोब्रागडे हे तिघे जण भाजले. त्यापैकी सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान डोंगरे यांचा गुरुवारी रात्री दीड वाजता तर दिलीप गजभिये यांचा सकाळी सात वाजता मृत्यू झाला.
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
दोन्ही मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. सुधीर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक दिव्यांग मुलगी आहे. दिलीप हेही विवाहित होते. लग्नानंतर काही वर्षांनंतर पत्नी माहेरी निघून गेल्याने ते एकट्यानेच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: Diesel Flare Two Died Of Burns During Funeral Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..