
नागपूर ः वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही अनेक वाहनचालक केवळ ‘क्रेझ’ म्हणून वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यानंतरही ते नंबर प्लेट बदलत नाहीत, ही बाब लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी ‘गांधगिरी’ दाखवत दंडाऐवजी थेट फॅन्सी नंबर प्लेटच बदलविण्याचा धडाका सुरू केला आहे. हा अभिनव उपक्रम वाहतूक पोलिस उपायुक्तांनी सुरू केला असून, अनेक वाहनचालकांना पोलिसांना वठणीवर आणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचा नोंदणी क्रमांक आकर्षक दिसावा, यासाठी 'दादा', 'मामा', 'भाई', आई, साई, अशा नंबर प्लेटसह नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांनी आता सुधरण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ दंडात्मक कारवाईचा सामना कराव्या लागणाऱ्या वाहनधारकांना दंड भरण्यास कोणतेही वावगे नव्हते. ‘दंड भरेल पण फॅन्सी नंबर प्लेट बदलणार नाही’ अशी भूमिका वाहनधारक घेत होते. वाहतूक पोलिसांच्या कारवाईची भीती राहिली नाही.
‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी वाहनाच्या नंबर प्लेटवर फोटो लावणे किंवा घोषवाक्य लिहिण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे आता वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांच्या निर्देशानुसार फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर दंड ठोकण्यापेक्षा थेट नंबर प्लेट बदलून देण्याची संकल्पना साकरण्यात आली.
इंदोरा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वजीर शेख यांनी फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची थेट रस्त्यावरच नंबर प्लेट बदलून देण्याच्या उपक्रमास सुरूवात केली. गेल्या चार डिसेंबरपासून ते उपक्रम राबवित आहेत. त्यांनी सर्वप्रथम शासनाच्या निर्देशानुसार नंबर प्लेट बनविणाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना पोलिस पथकासह उपस्थित राहण्याची विनंती केली.
पोलिसांची गांधीगिरी पाहता पेंटरही तयार झाला. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासह वाहतूक पोलिसांसोबत तो सेवा देत आहे. आतापर्यंत शहरातील शेकडो वाहनांची नंबर प्लेट वाहतूक पोलिसांनी बदलवली. यापुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक शेख यांनी दिली.
पोलिसांनी सध्या गांधीगिरी करीत वाहनचालकांमध्ये सकारात्मक विचार पेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यानंतरही फॅन्सी नंबर प्लेट वाहनाला दिसल्यास थेट गाडी जप्तीच्या कारवाईचाही सामना करावा लागेल. येत्या काही दिवसांतच वाहतूक पोलिस फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई सुरू करणार आहेत.
वस्तीतील चिल्लर कार्यकर्तेसुद्धा कार किंवा दुचाकीवर कमळ, घड्याळ, पंजा, विळा, हत्ती, धनुष्यबाण यासह विविध रंगांचे झेंडे लावतात. अशा वाहनांवर कारवाई करतेवेळी कार्यकर्ते थेट राजकीय दबावतंत्राचा वापर करतात. ‘भाऊंशी बोला...’ असे म्हणत फोन पोलिसांकडे देतात. नगरसेवकांपासून ते आमदारापर्यंत फोन लावून कारवाईतून सुटका केली जात असल्याची माहिती आहे.
वाहतुकीचे सर्वच नियम पाळा
फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. शासनाच्या निर्देशानुसारच वाहनांवर नंबर प्लेट लावण्यात याव्यात, अन्यथा कारवाई करण्यात येईल. तसेच वाहनचालकांनी वाहतुकीचे सर्वच नियम पाळावे. जेणेकरून दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागणार नाही तसेच पोलिसांनाही सहकार्य होईल.
- सारंग आवाड (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा)
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.