Diwail : दिवाळीत मिळेना लहानग्यांना बंदुक ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gun

Diwail : दिवाळीत मिळेना लहानग्यांना बंदुक !

नागपूर : दिवाळी आणि फटाके हे समीकरण रुढ असले तरी लहानग्यांच्या टिकली फोडण्याच्या बंदुकीलाही तेवढेच महत्त्व आहे. लहानग्यांच्या बंदुका दुकानात नसतील तर ग्राहक फटाके खरेदीसाठी थांबत नसल्याचे चित्र आहे. यंदा कामगार न मिळणे आणि कच्चा मालाचे वाढलेले दर आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे देशात फटाक्यातील बंदुकीची टंचाई निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. या बंदुकांच्या दरातही ४० टक्के वाढ झालेली आहे. परिणामी, ग्राहकांना अधिकच्या दरात बंदुक खरेदी करावी लागत आहे.

दिवाळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचे निर्बंध पुर्णपणे शिथिल झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे; परंतु फटाके तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व ट्रान्स्पोर्ट महागल्याने फटाक्यांच्या किमतीत सुमारे ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. मात्र, यंदा भाववाढ झाल्याने फटाक्यांची विक्री होत असली तरी ग्राहकांनी त्यावरील खर्च कमी केला आहे.

मुक्त वातावरणात दिवाळी साजरी होत असल्याने सर्व व्यवहार खुले झालेले आहेत. लोकांमध्ये उत्साह असल्याने फटाक्यांच्याही विक्रीला गती आली आहे. लहान मुलांच्या आवडत्या फटाक्यांच्या बंदुकीची टंचाई सध्या जाणवत आहे. त्यामुळे बंदुक आहे का, अशी विचारणा करूनच फटाके खरेदी करतात. बंदुक हे फटाके विक्रीतील महत्त्वाची वस्तू आहे. त्यामुळे टंचाई असली तरी बंदुकींची खरेदी केलेली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नवीन माचीस गनचे आकर्षण

दिवाळी म्हटले की लहान मुलांना आवडते ती बंदुक. फटाक्याच्या दुकानावर गेल्यावर त्यांचे नजर बंदुकीवरच असते. यंदा माचीस गन बाजारात आली असून त्यात टिकली नव्हे तर माचीसची काडी टाकल्यास त्यातून फटाक्याचा आवाज होतो. त्यामुळे टिकल्या खरेदी करण्याची गरज नसल्याने ही गन अनेकांचे आकर्षण ठरू लागली आहे. याशिवाय इतरही बंदुका बाजारात आहेत. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावाकडे गेलेले कामगार अद्यापही कारखान्याकडे परतलेले नसल्याने बंदुकीचे उत्पादन ३५ टक्के कमी झाले आहे. त्यामुळे बंदुकांची टंचाई जाणवत आहे.

-विराग संघवी, संचालक, मॉर्डन राखी भंडार