Nagpur : दिवाळीच्या तोंडावर झोपड्या तोडणे अमानवीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur slum Encroachment

Nagpur : दिवाळीच्या तोंडावर झोपड्या तोडणे अमानवीय

नागपूर - दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर असताना महानगरपालिकेने जयताळा परिसरातील सीम टाकळी येथील झोपडपट्टीवर बुलडोझर चालविला. एकीकडे दिवाळीचा झगमगाट असताना सीम टाकळी झोपडपट्टीवासीयांची दिवाळी अंधारात गेली. घर तोडल्याने लहान मुले सैरभैर झाली असून दिवाळीला कुणालाही नवे कपडे घेतले नसून घरच नसल्याने गोडधोडही होणार नाही. मनपाच्या या अमानवीय कृतीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

सीम टाकळी येथील गावठाण जमिनीवर अनेक कुटुंबे गेल्या ३० वर्षांपासून राहत आहेत. मोलमजुरी करणारे हे कुटुंब नियमित घर टॅक्स, वीजबिल, पाणीबील भरत आहेत. १५ वर्षांपेक्षा जास्तकाळ जर कुणी वास्तव्य करीत असेल तर त्याच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची आहे.

पण तसे न करता मनपाने गेल्या ७ ऑक्टोबर रोजी मनपाचे बुलडोझर आले आणि घरे पाडून टाकली. त्यातच दोन दिवस जोरदार पाऊस आल्याने रस्त्यावर आलेल्या कुटुंबांची दैना झाली. म्हातारी आणि लहान मुले पावसात भिजली. कित्येक आजारीही पडली.

कारवाई करण्यापूर्वी मनपा प्रशासनाने निदान दिवाळी सणाचा तरी विचार करायला हवा होता. आम्हाला रस्त्यावर आणून मनपाला काय मिळाले? अधिकाऱ्यांच्या मनात थोडीही दयामाया नाही काय? अशा संतप्त प्रतिक्रिया पीडितांनी व्यक्त केल्या. बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रूही होते.

हिवाळा लागल्याने रात्री दव पडल्याने अंगावरील अंथरूण भिजते. लहान मुले आणि वृद्धांना होणारा त्रास पाहवल्या जात नाही. जेसीबीच्या फावड्याने घरातील भांडीकुंडी चेपली आहेत. दुसऱ्याकडून भांडी आणून स्वयंपाक करावा लागत आहे. एकीकडे पीएम आवाज योजना राबवीत असताना आम्हाला मात्र, बेघर केले आहे.

-रेणुका गायकवाड, पीडित महिला

मला दोन मुली आहेत. एक सहावीत तर दुसरी अकरावी. परीक्षा सुरू असतानाच आमचे घर पाडले. मुलींना जबर मानसिक धक्का बसला. ‘स्‍ट्रीट लाईट’खाली बसून मुलींनी कसाबसा अभ्यास केला. मुलींच्या भविष्याची खूप चिंता वाटत आहे.

- ममता चहांदे, पीडित महिला

बाथरूम, संडास तोडल्याने आम्ही शौचास जायचे कुठे? तुटलेल्या संडासात मेनकापड, साड्यांचा आडोसा करीत शौचास बसावे लागते अन् तेही केवळ रात्री. महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

-कल्पना रामटेके, हातमजूर महिला

भुईसपाट झालेल्या घराच्या जमिनीच्या तुकड्यावर उघड्यावर झोपावे लागत आहे. दिवाळीच्या सणाला नातेवाइकांच्या घरी जाणे बरे वाटत नाही. रात्री दोनवेळा साप निघाले. जीव मुठीत घेऊन जगत आहोत. मनपाने आमच्यासोबत खूप वाईट केले. निदान दिवाळी तर होऊ द्यायची होती.

- दुर्गा बिरहा, पीडित महिला