esakal | तरुण वयात हृदय-फुफ्फुस पोकळीत तयार झाला वायू, 'असे' मिळाले जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

lungs

तरुण वयात हृदय-फुफ्फुस पोकळीत तयार झाला वायू, 'असे' मिळाले जीवदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अवघा ३२ वर्षाचा तरुण. घरात एकुलता एक कमवता. कोरोनाची (corona) लागण झाली. फुफ्फुसाची (lungs) लवचिकता कमी झाली. हृदय व फुफ्फुसाच्या मध्ये निर्माण झालेल्या पोकळीत (मीडियास्टिनम) वायू गोळा झाला. याशिवाय त्वचेखाली वायूचा थर साचला. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवात पसरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे चेहऱ्यावर सूज आली होती. जोखीम वाढल्याने तत्काळ पिगटेल इंन्सर्शन इन मीडियास्टिनम प्रक्रियेतून या युवकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. रुग्णासह नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले. (doctor gives life to patients who have air in between heart and lungs)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

क्रिम्स हॉस्पिटल येथील ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्या मार्गदर्शनात श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. परिमल देशपांडे यांच्या वैद्यकीय पथकाने ही प्रक्रिया केली. अत्यंत दुर्मिळ अशा विकारावर ‘न्युमोमीडियास्टिनम’ असे संबोधण्यात येत असल्याची माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली. हृदय आणि फुफ्फुसाच्या या दोन्हीमध्ये असणाऱ्या पोकळीत चेस्ट ट्युब टाकणे जोखमीचे होते. रुग्णाला व्हेंटिलेटर लावावे लागणार होते. तरी देखील डॉक्टरांच्या पथकाने जोखीम पत्करली आणि मीडियास्टिनममध्ये ट्युब टाकली. तब्बल दहा दिवस हृदयाजवळच्या पोकळीत ट्युब टाकून ठेवली होती. पोकळीतील हवा कमी होऊ लागली. १५ दिवसात ९० टक्के सूज कमी झाली. कोरोनामुळे फुफ्फुसावरील प्रभाव कमी झाला. नुकताच रुग्ण ठणठणीत बरा झाला. त्याला सुटी देण्यात आली. श्वसरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट, डॉ. परिमल देशपांडे, डॉ. स्वप्नील बाकमवार, डॉ. निलय निंबाळकर यांच्या प्रयत्नातून युवकाचा जीव वाचला.

रुग्ण गंभीरावस्थेत होता. कोरोनाची गुंतागुंत होती. त्यामुळे जोखीम वाढली होती. डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नांतून या युवकाचा जीव वाचवणे शक्य झाले. घरचा कर्ता पुरुषाचे जीव वाचविण्यात यश आले, याचे समाधान वाटते.
-डॉ. अशोक अरबट, श्वसन रोग तज्ज्ञ, नागपूर.
loading image