Nagpur News : तुकडी नसतानाही विद्यार्थी शिकला चौथीपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education

Nagpur News : तुकडी नसतानाही विद्यार्थी शिकला चौथीपर्यंत

नागपूर : शाळेत तुकडी नसतानाही शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रवेशित एका विद्यार्थ्याला चौथीपर्यंत शिकविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या हद्दीत असलेल्या शाळेत त्याला नर्सरी आणि केजीच्या मुलांसोबत बसवून शिक्षण पूर्ण केले जात असल्याचे चित्र आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे पालकांनी तक्रार केली आहे.

गोधनी परिसरात एक शाळा असून या शाळेत आरटीअंतर्गत एका विद्यार्थ्याचा क्रमांक लागला. मात्र, कालांतराने या शाळेत चौथीत तो एकटाच शिल्लक राहिला. त्यामुळे नियमानुसार त्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश देणे आवश्‍यक होते.

मात्र, पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शाळेत नेमके किती विद्यार्थी आहेत याची कधीच पाहणी न केल्याचे दिसून आले. त्यातून या विद्यार्थ्याला कधी नर्सरीच्या मुलांसोबत तर कधी मुख्याध्यापकाच्या खोलीत शिकविण्यात येते. याबाबत पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविली. मात्र,तक्रारीकडेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद प्रशासनाकडून सातत्याने कमी पटसंख्येच्या शाळांची तपासणी केली जाते. त्यातून ज्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होते, तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन नजिकच्या दुसऱ्या शाळेत केले जाते. मात्र, चार वर्षांपूर्वी आरटीईमध्ये प्रवेश घेतलेल्या शाळेच्या पटसंख्येची माहिती अधिकाऱ्यांना असू नये याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असून विद्यार्थ्याचाही मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे दिसते.

दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना प्रकरणाबाबत विचारणा केली असता, माहिती घेऊन सांगते असे त्या म्हणाल्या.

पालकांसोबत या तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन तक्रार केली. विभागाने याची दखल घेत, त्यावर योग्य ती कारवाई करावी.

— शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ॲक्शन कमिटी