
नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेला लावला कोट्यवधींचा चुना
नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाची परतफेड न करता बँकेची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. हा प्रकार मानेवाडा येथील आंध्रा बँक शाखेत घडला. बँकेत फसवणुकीची आठ प्रकरणे उघडकीस आली. या आठही प्रकरणात ठगबाजांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आंध्रा बँकेतील काही कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संगमताने आरोपींनी बनावट व खरे वाटेल असे कागदपत्र तयार करुन सदनिका विकत घेण्यासाठी तीन वेगवेगळी कर्ज प्रकरणे सादर केली. कागदपत्रांची पडताळणी न करता कर्ज मंजूर करण्यात आले. या मंजूर कर्जाच्या रकमेची उचल केल्यानंतर आरोपींनी परतफेड करण्याचे टाळले.
पहिल्या प्रकरणात मंगेश रंजीत जगताप (रा. रचना युतिका अपार्टमेंट, काचीमेट अमरावती रोड) आणि सुरेश काशीनाथ गोतमारे (रा. लघुवेतन हाऊसिंग सोसायटी कामठी रोड) अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी सदनिका खरेदी करण्याच्या बहाण्याने कर्ज प्रकरण तयार केले. मात्र, याकरिता सर्व कागदपत्र बनावट, खोटे तयार करुन आंध्रा बँकेत सादर करुन १ कोटी १९ लाख ४६ हजार ८११ रुपयाच्या कर्जाची उचल केली. परंतु, नंतर परतफेड केली नाही. दुसरे कर्जाचे प्रकरण थकबाकीसह २९ लाख १ हजार ३५४ रुपयांचे आहे. याप्रकरणी आरोपी नितेश नानाजी वारके (रा. रामकृष्णनगर, दिघोरी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वारके यांनी सदनिका विकत घेण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून कर्ज घेतले. नंतर परतफेड केली नाही.
तिसऱ्या प्रकरणात व्यवसाय सुरू करण्यासाठी खोटी कागदपत्रे बँकेकडे सादर केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्राची पडताळणी न करता २३ लाखाचे कर्ज मंजूर केले. दरम्यान आरोपींनी काही रकमेची परतफेड केली. मात्र २२ लाख ५२ हजार ०१६ रुपयांची परतफेड न करता फसवणूक केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मंगेश रंजीत जगताप (रा. रचना युतिका अपार्टमेंट, काचीमेट अमरावती रोड), अपर्णा गोपालकृष्ण कोमावार (रा. सर्वेनगर, जयताळा रोड) आणि सैयद मुस्तफा (रा. समृद्धी संकुल, सिव्हिल लाईन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याशिवाय अजून पाच विविध प्रकरणात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात सतीश प्रभाकर काळेश्वरराव रा. दिघोरी, गणेश अंकुश लांजेवार रा. नेहा अपार्टमेंट नागपूर, अमोल कुंभारे, रविकीरण कुंभारे दोन्ही रा. हसनबाग यांचा समावेश आहे.
१ कोटी ७१ लाखांनी फसवणूक
आंध्र बँकेचे युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत विलीनीकरण होताच तिन्ही प्रकरणे मिळून आरोपींनी बँकेची एकूण १ कोटी ७१ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे पुढे आले. आंध्रा बँकेचे काही वर्षांपूर्वी युनियन बँक ऑफ इंडियात विलीनीकरण करण्यात आले. ही तिन्ही कर्ज प्रकरणे वर्ष २०१५, २०१७, २०२० दरम्यानची आहेत. याप्रकरणी फिर्यादी बँकेचे व्यवस्थापक शोभित अशोक घोरमारे (३६) रा. महालक्ष्मीनगर, नरसाळा रोड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Fake Document Billion Rupees Deposited The Bank Fraud
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..