शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड : लवकरच पैसा खात्यात होणार वळता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain crop Damage Compensation

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड : लवकरच पैसा खात्यात होणार वळता

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. शासनाने मात्र, यासाठी दुप्पट मदत देण्याची घोषणा केली आहे. निधीही जिल्हाधिकारी यांच्याकडे वळता केला. लवकरच मदतीचा निधी शासनाच्या खात्यात जमा होणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला. शासनाची मदत ही खर्चाच्या तुलनेत नगण्य असल्याने तो चिंतातूर होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निकषाच्या दुप्पट मदत निधी देण्यासाठीसोबत तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे जाहीर केले. पूर्ण मदत देण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने १५ सप्टेंबरपासून १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने २ लाख ६७ हजार ९२ शेतकरी बाधित असून २ लाख ४२ हजार ८११ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला होता. या नुकसानीच्या भरपाईसाठी ३३९ कोटी ६८ लाख ५३ हजारांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्यास मंजुरी दिली आहे. आठवडाभरापूर्वी याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित केला. परंतु, अद्याप एकही रुपया जिल्हा प्रशासनाकडे आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात निधीच वळता झाला नाही.

अशी मिळणार मदत

  • ओलिताखाली पिकांना हेक्टरी २७ हजार रुपये हेक्टरी मदत मिळेल. तीन हेक्टरनुसार ८१ हजार.

  • कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३,६०० हजार रुपये हेक्टरी मदत मिळेल. तीन हेक्टरनुसार ४० हजार ८००.

  • फळपिकांसाठी ३६००० हजार हेक्टरनुसार तीन हेक्टरपर्यंत १ लाख ८ हजार.

‘सकाळ’ने दिले होते वृत्त

१५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याचा मुहूर्त चुकला. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्यामुळे मंत्रालय स्तरावर खळबळ उडाली. आज निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळता करण्यात आला.

निधी लवकरच तालुकास्तरावर

प्रशासनाने पाठविल्या अहवालानुसार संपूर्ण ३३९ कोटी ६८ लाखांचा निधी शासनाने दिला. हा निधी एक, दोन दिवसात तालुकास्तरावर पाठविण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा निधी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात वळता होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Web Title: Farmers Heavy Rains And Floods Crop Damage Compensation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..