esakal | पेंचमध्ये पहिल्याच सफारीत दिसले वाघोबा!
sakal

बोलून बातमी शोधा

pench

पेंचमध्ये पहिल्याच सफारीत दिसले वाघोबा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ताडोबापाठोपाठ आता पेंच व्याघ्रप्रकल्पातही पर्यटकांना वाघ आणि बिबट्यांचे कायम दर्शन होत असल्याने त्यांची पावले वळू लागली आहे. सकाळी खुर्सापार गेटवर बछड्यासह वाघिण, सिल्लारीच्या खापा रोडवर बिबट्या तर बोट कॅम्परिसरात मगर दिसल्याने पर्यटकांची पहिल्याच दिवसाची सफारी अविस्मरणीय ठरली. आल्हाददायक आणि निसर्गरम्य वातावरण वाघ आणि बिबट दिसल्याने तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, असे एका पर्यटकांनी सांगितले.

कोरोना आणि पावसाळी सुटीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्प बंद होता. नव्वद दिवसाच्या विश्रांतीनंतर आजपासून प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील पर्यटन सुरू करण्यात आले. सकाळी सर्व प्रथम पोचलेल्या पर्यटकांच्या हस्ते पूजा करून मुख्य दरवाजा उघडण्यात आला. सकाळी व सांयकाळी दोन्ही वेळेस अंदाजे १५ ते १८ जिप्सीतून पर्यटकांनी सफारी केली. प्रवेश करताच पर्यटकांना नीलगाय, हरिण, मोर आणि ससा दिसल्याने चिमुकले आनंदाने हरखून गेले. समोर गेल्यानंतर बोट कॅम्प परिसरात उन्हात पहुडलेली मगर दिसली. सोबतच विविध पक्षी, घुबड, मालाबार हिल, गरुड आकाशात आणि झाडांवर दिसले

पेंच व्याघ्र प्रकल्पात पहिल्याच दिवशी खुर्सापार प्रवेशद्वारातून गेलेल्या पर्यटकांना वाघिणीसह बछड्याचे दर्शन झाले. सिल्लारी गेटवर पायाचे ठसे अनेक ठिकाणी दिसले. तेही ताजेच होते. अनेक ठिकाणी प्राण्यांचे ‘कॉल्स' म्हणजे परिसरात वाघ अथवा बिबट असल्याचे संकेत प्राणी देत असल्याचे ऐकू येत होते.

पर्यटक आनंदले

जंगलातील वातावरण अतिशय अल्हाददायक आणि शुद्ध असल्याने ताजेतवाने वाटत होते. पहिल्याच दिवशी पहिलीच सफारी करण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. गव्यांच्या कळपासह बिबट, हरिण, नीलगाय आणि इतरही प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन झाल्याने सफारी यशस्वी झाल्याचा आनंद कौस्तुभ सोनी याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

पहिल्याच दिवशी बिबट्याचे दर्शन झाल्याने सुरवात चांगली झालेली आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे पर्यटन बंद असल्याने प्राण्यांच्या मुक्त वावर वाढला आहे. प्राण्यांची संख्याही झपाट्याने वाढलेली आहे. पावसाळ्यानंतर पर्यटनाचा श्रीगणेशा झाल्याने त्यावर अवलंबून असलेले गाइड, जिप्सी चालक, हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

सुरेश म्हरसकोल्हे, संचालक, सृष्टी होम स्टे.

loading image
go to top