esakal | विदर्भातील पहिले कृत्रिम व्हॉलीबॉल मैदान नागपूच्या मनीषनगरात 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परिसरातील क्रीडाप्रेमींनी दोन वर्षांपूर्वी मैदानाचा प्रस्ताव दिल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री व दक्षिण- पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतूनच महानगरपालिकेच्या पायल पल्लवी सोसायटी मैदानावर हे व्हॉलीबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहे.

विदर्भातील पहिले कृत्रिम व्हॉलीबॉल मैदान नागपूच्या मनीषनगरात 

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : युवा व्हॉलीबॉलपटूंना दर्जेदार मैदानावर सराव करता यावा तसेच शहरात विशेषतः दक्षिण- पश्चिम नागपुरात व्हॉलीबॉलचे उत्तम कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने मनीषनगर येथे कृत्रिम (टर्फ) व्हॉलीबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. नागपुरातच नव्हे, संपूर्ण विदर्भात अशा प्रकारचे हे पहिलेच कृत्रिम मैदान ठरले आहे. मैदानामुळे भविष्यात या परिसरात व्हॉलीबॉलला बूस्ट मिळणार असून, सरावासोबतच स्पर्धाही होऊ शकणार आहेत. 


परिसरातील क्रीडाप्रेमींनी दोन वर्षांपूर्वी मैदानाचा प्रस्ताव दिल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री व दक्षिण- पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतूनच महानगरपालिकेच्या पायल पल्लवी सोसायटी मैदानावर हे व्हॉलीबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहे. मैदान परिसरात दोन खोल्या, ट्रॅक, बगीचा, पिण्याच्या पाण्यासह सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. खेळाडूंना रात्री सराव करता यावा, यासाठी भविष्यात येथे प्रेक्षक गॅलरी व फ्लडलाईट्सही लावण्यात येणार आहे. मैदानासाठी प्रभाग ३५ च्या नगरसेविका विशाखा मोहोड, प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा किर्ती धोंगडे, माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू नीलेश मते, भूषण केसकर, सुधीर पंचवारे, रमेश सोमकुंवर, गौरव कडे यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. 


हेही वाचा : *आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक*
 


नागपूर व विदर्भातील या पहिल्या कृत्रिम व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन नुकतेच नगरसेविका विशाखा मोहोड यांच्या हस्ते झाले. उदघाटनानंतर खेळाडूंचा सरावही सुरू झालेला आहे. सध्यास्थितीत येथे सकाळी व संध्याकाळी पन्नासच्यावर खेळाडू सरावासाठी येत असून, नीलेश मते व अन्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहेत. कोरोनामुळे खेळाडूंची संख्या मर्यादित असली तरी, लवकरच येथील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या मैदानामुळे नागपूरच्या युवा खेळाडूंना खूप फायदा होणार आहे. विशेषतः दक्षिण- पश्चिम नागपुरात व्हॉलीबॉलची क्रेझ वाढणार आहे. खेळाडूंना केवळ सरावाचीच संधी मिळणार नाही, तर भविष्यात येथे स्पर्धाही होण्याची शक्यता आहे. 


''खेळाडूंना प्रॅक्टिससाठी चांगले दर्जेदार मैदान असावे, अशी अनेक दिवसांपासूनची क्रीडाप्रेमींची आग्रही मागणी होती. सुदैवाने माजी मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. परिसरातील युवा खेळाडू या संधीचा पुरेपूर फायदा घेतील, अशी अपेक्षा आहे. '' 
-किर्ती धोंगडे, प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा 

संपादन : नरेश शेळके 

loading image
go to top