esakal | सावधान! 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सावधान! 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत असतानाच नागपुरात कोरोना विषाणुंचे पाच नवे प्रकार आढळल्याने आणखी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)मधून सुमारे ७४ नमुने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत तपासणीसाठी दिल्ली तसेच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये कोरोनाच्या ५ नवीन रुपांची ओळख पटली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यातच कोरोना विषाणुचा वेगाने प्रसार झाला. घराघरांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. सोबतच मृतांची संख्याही वाढतच आहे. संसर्ग आणि मृत्यूची त्सुनामी का आली आहे याचे कारण नवीन स्ट्रेनच्या रूपात समोर आले आहे. नागपुरातील काही नमुन्यांमध्ये कोरोनाची E484Q: L452R हे नवीन दोन स्ट्रेन आढळून आले आहेत. यामुळेच नागपुरात कोरोनाचे संक्रमण अधिक गतीने वाढले. या नवीन स्ट्रेनमुळे लक्षणांमध्येही बदल झाला असून पूर्वी डोके आणि डोळ्यांचे दुखणे नव्हते. मात्र, या नवीन स्ट्रेनमध्ये हे दोन्ही लक्षणे आढळून येत आहेत. फेब्रुवारीमध्ये दिल्लीला पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल बराच उशिरा आला. ७ एप्रिल रोजी अहवाल आला. त्यात पाच नवीन रूपे सापडली. यामुळेच जिल्ह्यात संसर्ग वेगाने पसरला असल्याची माहिती प्राप्त झाली.

हेही वाचा: स्वप्नांची सफर घडविणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ; टूर ऑपरेटर्स विकताहेत आंबे आणि भाजीपाला

कोरोना विषाणुची नवीन रुप -

फेब्रुवारी महिन्यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने हे नमुने तपासणीसाठी आयसीएमआरचे ७४ नमुने दिल्ली येथे पाठविले. या अहवालात नागपुरात पाच नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. यापैकी, यूकेमधील एकही रूप नाही. ७४ नमुन्यांपैकी १ नमुना E484K हा आढळला. ३ नमुन्यात E484Q चे रुप तर २ नमुन्यांमध्ये N440K हे नवीन रुप आढळले. २६ नमुने E484Q: L452R आणि ७ नमुने L452R रुपांचे आढळून आले आहेत. उर्वरित ३५ नमुन्यांमध्ये जुनेच स्ट्रेन आढळल्याची माहिती आहे. या पाचही नवीन स्ट्रेनमुळे प्रतिकारशक्ती क्षमता कमी होते. या नमुन्यांचा अहवाल एप्रिल महिन्यात मिळाला. हा अहवाल यापूर्वी मिळाला असता तर संसर्ग रोखण्यात मोठ्या प्रमाणात मदत झाली असती असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका तज्ज्ञाने सांगितले.

नवीन रुपांमुळे लक्षणात बदल -

  • नवीन स्ट्रेनमुळे ताणतणावात वाढ

  • डोक्याच्या तसेच डोळ्यांच्या वेदना

  • ८ ते १२दिवस राहणारा ताप

  • सर्दी, खोकल्यासह अंगदुखी

loading image