esakal | स्वप्नांची सफर घडविणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ; टूर ऑपरेटर्स विकताहेत आंबे आणि भाजीपाला
sakal

बोलून बातमी शोधा

स्वप्नांची सफर घडविणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ; टूर ऑपरेटर्स विकताहेत आंबे आणि भाजीपाला

स्वप्नांची सफर घडविणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ; टूर ऑपरेटर्स विकताहेत आंबे आणि भाजीपाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विदेशात सहलीला जाण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स ऑपरेटरांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेकांनी आता ऑनलाइन व्यवसाय सुरू केले असून काहींनी हापूस आंबे विक्रीचा व्यवसाय थाटला तर अनेकांनी इतर व्यवसायाची कास धरली आहे.

हेही वाचा: वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

विदेशात सहलीला जाण्याचे स्वप्न खरे तर मध्यमवर्गांसाठी स्वप्नासारखेच होते. केवळ चित्रपटांमध्ये परदेशातील नयनरम्य दृश्‍य पाहून मध्यमवर्गीय तसेच गरीब वर्गातील लोक आपले समाधान करून घेत होते, मात्र मागील काही वर्षांत टूर्स ऑपरेटरांच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांचे विदेशवारीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली.

अतिशय सामान्य परिस्थितीतील लोकसुद्धा पॅकेजमध्ये विदेश सहलीला जाऊन आपली व आपल्या कुटुंबीयांची स्वप्नपूर्ती करीत होते. मात्र मागील वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या वादळामुळे हा व्यवसाय पूर्णतः डबघाईला आला आहे. कोरोना तसेच लॉकडाउनमुळे गेल्या वर्षीपासून या व्यवसायाला उतरती कळा लागली. मध्यंतरी पुन्हा पर्यटन व्यवसाय सुरू झाला, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पर्यटनाला फटका बसला आणि टूर्स ऑपरेटवर पुन्हा एकदा गंडांतर आले.

हेही वाचा: 'दुपारपर्यंत आमच्याशी बोलला अचानक रात्री मुत्यू कसा?' नातेवाईकांचा डॉक्टरांविरोधात संताप

केवळ टूर ऑपरेटर्सच नव्हे तर त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने तेसुद्धा बेरोजगार झाले आहेत. यापैकी अनेक जणांनी स्वतःचा हापूस विक्रीचा व्यवसाय सुरू केला तर अनेकांनी ठोक भाजीपाला विक्रीला सुरुवात केली. यामध्ये मिळकत जरी कमी असली तरी किमान सीझन तरी काढता येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, सध्याच्या स्थितीत घरात लॉकडाउन असलेले नागरिक कोरोनाचे संकट टळल्यावर परत एकदा देशविदेशातील सहलीला निघणार असल्याने या व्यवसायाला चांगलीच झळाली येईल, अशी आशासुद्धा या व्यवसायातील काही लोक करीत आहेत.

कोरोनाच्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसलाय तो पर्यटन उद्योगाला. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. आम्ही सहा ते आठ महिने कर्मचाऱ्यांना वेतन दिले. मात्र आता नाईलाज झाला आहे. त्यामुळेच अनेकांनी आता दुसरे रोजगार शोधण्यास सुरुवात केली आहे. मी स्वतः ऑनलाइन हापूस आंब्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
-भाग्यश्री सेंगर, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image