धरणांत बुडून चौघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four drowned in dams Amravati

धरणांत बुडून चौघांचा मृत्यू

अमरावती - नांदगावपेठ परिसरातील वाळकी येथील बोर नदीवर असलेल्या धरणामध्ये दोन युवक बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकाचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरूच होते. सायंकाळी दोन्ही युवकांचे मृतदेह आढळल्याचे पोलिस निरीक्षक काळे यांनी सांगितले.

रविवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. रहाटगाव आणि नवसारी परिसरातील काही युवक अंघोळ करण्यासाठी दुपारी बोर नदीवर बांधलेल्या वाळकी धरणक्षेत्रात आले. या धरण क्षेत्रात आधीच बऱ्यापैकी पाणी होते. त्यातच नुकताच सुरू झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी वाढली. धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या युवकांपैकी दोघे अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, अंघोळ करीत असताना ते बुडाले. विनय शिवदास चव्हाण (वय २०, रा. नवसारी) व अभिषेक प्रदीप कुरळकर (वय २१, रा. रहाटगाव), अशी बुडालेल्या युवकांची नावे असल्याचे नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले.

विजय याच्यासोबत असलेल्या मित्राने त्याला बुडताना बघितले. घटनास्थळी नांदगावपेठ पोलिसांसह जिल्हा शोध व बचाव पथकाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. उशिरापर्यंत बोर नदीच्या धरणात दुसऱ्या युवकाचा शोध सुरू होता. सायंकाळी शोध व बचाव पथकाला या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

दोन युवतींचे मृतदेह आढळले

अचलपूर (जि. अमरावती) : सापन नदीवरील वझ्झर धरणात दोन युवतींचे मृतदेह आढळले. ही घटना रविवारी (ता. २६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. परतवाडा पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. गायत्री श्रीराम पडोळे (रा.कांडली) व हेमलता जवाहरलाल घाटे (रा. मुगलाई पुरा) अशी मृत युवतींची नावे आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

परतवाडा पोलिस स्टेशनमध्ये आज सकाळी कांडली येथील गायत्रीच्या आईने तर मुगलाई येथील हेमलताच्या आजीने हरविल्याची तक्रार दाखल केली होती. गायत्री ही होमगार्ड म्हणून कार्यरत होती. या दोघीही पोलिस भरतीची तयारी करत होत्या. दररोज सकाळी त्या धावण्याचा सराव करण्याकरीता जात होत्या. मात्र, सापन धरणाच्या परिसरात या दोन्ही युवतींचे मृतदेह आढळल्याने हा घात की अपघात, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

Web Title: Four Drowned In Dams Amravati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..