जाहिरात कंपनीच्या संचालकाला साडेपाच कोटींनी लावला चुना

file photo
file photo

नागपूर : शहरातील मोक्‍याच्या जागी भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन प्रॉपर्टी डीलरच्या टोळीने नागपुरातील जाहिरात कंपनीचे संचालक सुशील रमेश कोल्हे (वय 29 रा. वांजरा) यांची साडेपाच कोटींनी फसवणूक केली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोन प्रॉपर्टी डिलरसह आठ जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

प्रॉपर्टी डिलर जाहीद मिर्झा बेग (रा. न्यू कॉलनी सदर), प्रॉपर्टी डीलर गौतम सिंग (रा. जाफरनगर), बंटी शैलेंद्र शॉ, आशिष जैन, प्रशांत सतलारकर (रा.सदर), सुजीत कुमार (रा. झिंगाबाई टाकळी), नईम खान आणि वाकेकर कुटुंब, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बेग व सिंग प्रॉपर्टी डिलर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कोल्हे यांची सिव्हिल लाइन्समध्ये एजीएम कॉर्पोरेशन नावाची डिजीटल जाहिरात कंपनी आहे. जाहिद बेग व गौतम सिंग या दोघांनी अन्य साथीदारांच्या मदतीने कोल्हे यांच्याशी संपर्क साधला. 

स्मृती टॉकीज समोरील धार्मिक स्थळाची जागा, चेकर्स हॉटेल्सची जागा, जरीपटक्‍यातील स्मशानघाटाजवळील जागा व अन्य जागा कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या जागेचे बनावट दस्तऐवजही त्यांनी कोल्हे यांना दाखविले. या जागेत गुंतवणूक केल्यास कोट्‌यवधीचा नफा मिळण्याचे आमिषही त्यांना दिले. 2018 पासून कोल्हे यांनी सिंग, बेग व अन्य आरोपींना पैसे देण्यास सुरूवात केली. दोन वर्षांच्या कालावधीत कोल्हे यांनी आरोपींना पाच कोटी 55 लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतरही जागा कोल्हे यांच्या नावे करण्यासाठी आरोपी टाळाटाळ करू लागले. 

कोल्हे यांनी पैसे परत मागितले असता, आरोपींनी पैसे देण्यासही नकार दिला. त्यामुळे कोल्हे तणावात आले. याचदरम्यान कोल्हे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमधून आलेल्या माहितीच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी कोल्हे यांचे बयाण घेतले. त्यानंतर आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी भूमिगत झाले आहेत. पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com