
हिंगणा : वेणा व दुर्गा नदीच्या पवित्र संगमावर वसलेले तीर्थक्षेत्र श्री दक्षिण प्रयाग म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र हनुमानगड मंदिरात उजव्या सोंडेचा प्रसिद्ध गणपती आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असल्याने हजारो भाविक गणेशोत्सवात दर्शनासाठी मंदिरात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्री क्षेत्र हनुमानगड मंदिराच्या पायथ्याशी वेणा व दुर्गा नदीचा पवित्र असा संगम आहे. या संगमामुळे या तीर्थक्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. गणपती मंदिर सुमारे १५० वर्षापूर्वीचे पुरातन आहे. विशेष असे की, उजव्या सोंडेचा गणपती या मंदिरात आहे. श्रीमंत राजे बाजीराव महाराज पेशवे पुणे आणि श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले नागपूर यांची लढाई अंबाझरी पटांगणात नागपुरात झाली. तेव्हा बाजीराव पेशव्यांनी भोसलेंशी तहनामा केला. साधुसंतांनी समृद्ध असलेल्या हिंगणानगरीत थोडी जागा द्यावी, अशी विनंती केली. मुधोजी राजे यांनी ती मान्य केली. वेणा व दुर्गा नदीच्या संगमावर मातीचा किल्ला बांधून ते राहू लागले. त्यांचे कुलदैवत सिद्धिविनायक होते. त्यांनी श्री सिद्धी विनायकाची उजव्या सोंडेच्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून नवसाला पावणारा उजव्या सोंडेचा गणपती म्हणून या मंदिराची ख्याती सर्व दूर पसरली.
दरवर्षी तिळी चतुर्थीला मोठी यात्रा या संगमावर भरते. यावेळी हजारोच्या संख्येने भाविक यात्रेत दर्शनासाठी दाखल होतात. ऋषी पंचमीचा सोहळाही या संगमावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
श्री क्षेत्र हनुमानगड देवस्थान कमिटीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आक्कर्षक अशी रोषणाई केली आहे. गणेश चतुर्थी पासूनच भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने मंदिरात येत आहेत. भास्कर महाराज सद्यस्थितीत मंदिरातील पूजाअर्चाचे काम सांभाळत आहेत. दहा दिवस सुरू असलेल्या या गणेशोत्सवात दररोज भाविक दूरदूरून दर्शनासाठी या मंदिरात येतात. मंदिरात भाविकांकडून अभिषेक केला जात आहे. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून श्रीक्षेत्र हनुमानगड देवस्थान कमिटी लक्ष ठेवून आहे. गणेशोत्सवा दरम्यान श्री क्षेत्र हनुमानगड देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर देशमुख, विश्वस्त माजी नगरसेवक शिरीष देशमुख, धनराज कोठे, पांडुरंग कोठे, दामोदर घोडे, विष्णू भाकरे ,नारायण चिडे ,गोवर्धन साळवे, अशोक हिंगणेकर परिश्रम घेत आहेत.
काय महत्व आहे, उजव्या सोंडेचा गणपतीचे?
उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीची खरेदी घरासाठी केली जात नाही. अशा गणपतीचा फारच थाट सोहळे राखावे लागतेय. जे प्रत्येक घरात होणे शक्य नसते. असे गणपती मंदिरात किंवा सार्वजनिक गणेश मंडळामध्ये स्थापित केले जातात. म्हणून घरासाठी डाव्या सोंडेचा गणपतीची मूर्तीच आणायला हवी, असे मानले जाते. यालाच वाममुखी गणपती म्हणतात .हा गणपती घरात पूजेसाठी विशेष ठेवला जात असतो. गणपतीची नियमित पूजा आरती करावी लागते. उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्विकता वाढते व दक्षिणेकडून येणाऱ्या रजलहरीचा त्रास होत नाही.