बाप्पासाठी ४० किलो सोन्याचे सिंहासन

टेकडी मंदिराचे ९५ टक्के काम पूर्ण : २१ किलो चांदीचा कळस लावणार; गुलाबी, लाल पाषाणाचा वापर
Ganesh idol 40 kg gold throne Nagpur
Ganesh idol 40 kg gold throne Nagpur

नागपूर : शहरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिराचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच गणपती बाप्पाला ४० किलोच्या सोन्याच्या सिंहासनावर विराजमान करण्यात येईल. मुख्य कळसावर २१ किलो चांदीचा कळस लावण्यात येणार आहे. ४०० किलो चांदीचा वापर करून मंदिराच्या आतील सीलिंग करण्यात येणार आहे. २०० किलो चांदीच्या सीलिंगचे काम पूर्ण झालेले आहे.

कोरोना काळात संपूर्ण जगच थांबले होते. मंदिरेही दीर्घकाळ बंद होती. त्यामुळे टेकडी गणेश मंदिराचे बांधकाम थंडावले होते. कोरोना प्रादुर्भावातून शिथिलता मिळाल्यानंतर बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र, मंदिर बंद असल्याने भाविक येत नव्हते. मंदिराचे उत्पन्न पूर्णपणे बंद झालेले होते. परिणामी, मंदिरात काम करणारे पुजारी, कामगारांचे पगार देणेही अवघड झाले होते. त्यांच्या पगारासह मंदिरातील बांधकामासाठी व्यवस्थापनाने १३ किलो सोन्याची विक्री केली. त्यातून बांधकाम साहित्य खरेदी, पुजाऱ्यांचे पगार, मंदिराच्या थांबलेल्या विकास कामाला गती मिळाली.

पुढील वर्षात पूर्णतः: नवीन ‘लूक’ मध्ये भव्य स्वरूपातील मंदिर उभे राहील. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या (सॅण्ड स्टोन) पाषाणांपासून केले जात आहे. गुलाबी रंगाचे पाषाण भरतपूर येथून आणले आहे. या बांधकामात विटेचा वापर केलेला नाही. त्यामुळेच मंदिराचे नवीन रूप गुलाबी रंगात रंगलेले दिसून येत आहे.

आतापर्यंत १२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. संपूर्ण निधी हा मंदिराच्या गंगाजळीतून खर्च करण्यात आला आहे. मंदिरासाठी जवळपास सहा ते साडेसहा हजार चौरस फूट पाषाण वापरण्यात येत आहे. यापैकी ८० टक्के काम गुलाबी तर २० टक्के काम लाल पाषाणांपासून करण्यात येत आहे.

साउंडप्रूफ ध्यान केंद्र

मंदिरात गणेशमूर्तीच्या समोर वरच्या बाजूला ध्यान केंद्र बनविण्याचीही तयारी सुरू आहे. हे केंद्र काचेने पूर्णत: बंद असेल. येथे बसून भक्त कुठल्याही आवाज-गोंधळाशिवाय ध्यान करू शकतील.‘बाल्कनी’वर जाण्यासाठी एकच जिना बनविण्यात येत आहे.

४०० किलो चांदीचे सीलिंग

मंदिरात चांदीचे फॉल सीलिंग करण्यात आले आहे. त्यासाठी २०० किलो चांदीचा वापर करण्यात आलेला आहे. अजूनही काही काम शिल्लक असून त्यासाठी अजून २०० किलो चांदी लागणार आहे. मुख्य कळसाचे काम अद्यापही शिल्लक आहे. त्यावर २१ किलो चांदीचा कळस लावण्यात येणार आहे. पूर्ण मंदिराला २१ कळस असून २० कळसांना पितळेच्या धातूचे कळस लावले जाणार आहेत.

गणेश टेकडी मंदिराचा ‘मेक ओव्हर’ करण्यात येत आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येत असून ९५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. बाप्पासाठी ४० किलोच्या सिंहासन आणि ४०० किलो चांदीचे सीलिंग करण्यात येणार आहे.

- श्रीराम कुलकर्णी, उपाध्यक्ष,श्री गणेश मंदिर टेकडी ट्रस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com