Nagpur : शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शेतकऱ्याचा कापूस स्वस्त तर कपडा महाग आहे. गहू स्वस्त तर ब्रेड महाग असे आपल्याकडे समीकरण आहे. शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करून त्याला अधिक पैसा मिळू द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हिंगणा येथे अशोका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, जि.प.तील भाजपाचे गटनेते आतिष उमरे, प्रज्ञा म्हस्के, अरुण कोहळे, मधुसूदन रुंगठा, श्रीमती रेणुका श्यामकुळे, पल्लवी श्यामकुळे, अमोल श्यामकुळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना गडकरी पुढे म्हणाले, यापूर्वीही दोन उद्योग श्यामकुळे परिवाराने कर्ज घेऊन सुरू केले. ते कर्ज त्यांनी पूर्ण परत केले. कर्ज घेणे सोपे आहे, पण परत करणे कठीण आहे. अमोल श्यामकुळे यांनी कर्ज परत केले त्यामुळे ते यशस्वी उद्योजक असल्याचे सिध्द केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे सांगताना गडकरी म्हणाले, हिंगण्याच्या भागातील नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी उपलब्ध होऊ शकते.

जलसंधारणाच्या या कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. तसेच विजेच्या पंपाऐवजी सोलर पंप वापरला, तर या भागातील शेतकऱ्यांची गरिबी, उपासमार संपेल व कुणी आत्महत्या करणार नाही. गेल्या वर्षी ८ हजार टन संत्रा आपण नागपुरातून निर्यात केला. यंदा १ लाख टन संत्रा निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्याला डॉलरमध्ये उत्पन्न होईल. विदर्भाचा विकास केवळ भाषणांमुळे होणार नाही तर सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असेही गडकरी म्हणाले.

loading image
go to top