जगण्यासाठीचा पूजाचा संघर्ष प्रत्येकासाठी आदर्श | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

glorious story of Pooja Mhaske Karate struggle for survival is ideal for everyone nagpur

जगण्यासाठीचा पूजाचा संघर्ष प्रत्येकासाठी आदर्श

नागपूर : तिचा कराटेचा पाया भक्कम होता. त्या आधारावरच तिने वुशु खेळात प्रवेश केला आणि केवळ तीन वर्षाच्या कालावधीत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. मात्र, क्रीडा क्षेत्रातील हे यश जरी तिला मिळाले असले तरी खेळासोबत जगण्यासाठीचा तिचा संघर्ष प्रत्येकासाठी एक आदर्श आहे. हे कोणत्या चित्रपटाचे कथानक नसून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू पूजा म्हस्केची गौरवगाथा आहे.

पतियाळा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुशु स्पर्धेत पूजाने इव्हेंट प्रकारात रौप्यपदक जिंकले. या कामगिरीमुळे ती बंगळूर येथे होणाऱ्या विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. पंडित बच्छराज व्यास शाळेची माजी विद्यार्थिनी असलेली आणि आता विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागात एमपीएडची विद्यार्थिनी असलेल्या पूजाची कारकीर्द सुरू झाली ती कराटे खेळण्याने. कराटेत तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर १४-१५ पदके जिंकली आहेत.

२०१७ मध्ये मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत तिने पदक जिंकले आहे. संजय इंगोले यांच्या मार्गदर्शनात कराटेचे धडे गिरविल्यानंतर तीन वर्षापूर्वी प्रफुल गजभिये यांनी तिला वुशु खेळण्याचा सल्ला दिला आणि पहिल्याच वर्षी तिने राज्य स्पर्धेत भाग घेतला. मात्र, कोरोना, लॉकडाउन आणि त्यातही घरची परिस्थती यामुळे पूजा खेळ सोडण्याची मानसिकतेत होती. कारण पूजाला सांभाळण्यासाठी तिची आई खासगी नोकरी करते. पूजाही आपल्या शिक्षणाला थोडाफार हातभार लावण्यासाठी झुम्बाचे क्लासेस घेते. अशा परिस्थिती प्रशिक्षकासोबतच तिची आई तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली.

याबाबत पूजा म्हणते, संजय इंगोले, प्रफुल गजभिये, नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक शरद सूर्यवंशी यांनी मला प्रोत्साहन दिले नसते आणि आई खंबीरपणे उभी राहिली नसती तर मी पतियाळा येथे पदक जिंकूच शकले नसते. हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या पूजाचा दिवस सकाळी सहाला सुरू होतो आणि रात्री साडे नऊला संपतो. तरीही तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम असते. ती सध्या स्पर्धा परिक्षेची ही तयारी करीत आहे त्यामुळे सकाळी कॉलेज, त्यानंतर झुम्बाचे क्लासेस घेणे, त्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या वर्गाला उपस्थित राहणे, पुन्हा कॉलेज आणि सराव असा तिचा नित्यक्रम असतो.

बरेच ऐकावे लागते

सराव, एमपीएडचे क्लासेस, झुम्बा डान्स क्लासेस, स्पर्धा परिक्षेचे वर्ग, इतर खेळात पंच म्हणून उपस्थित राहणे हे सर्व करताना बरेच ‘मॅनेजमेंट'' करावे लागते. त्यापेक्षाही अनेकदा लोकांची बोलणी ऐकावी लागतात. त्याचे वाईट वाटते. नोकरीची गरज जशी सर्वांना आहे, तशीच मलाही आहे. आता रौप्यपदक जिंकल्यानंतर विद्यापीठाकडून पुरस्कार राशी मिळणे अपेक्षीत असले तरी वुशु खेळाला लागणारा ड्रेस अतिशय महाग येतो. यासाठी कुणीतरी मदत करावी आणि खेळाडूंना टोमणे मारण्यापेक्षा सन्मानाने वागवावे हीच माफक अपेक्षा आहे, असे पूजा म्हणाली.

Web Title: Glorious Story Of Pooja Mhaske Karate Struggle For Survival Is Ideal For Everyone Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top