esakal | 'मेडिकल'मधील डॉक्टरांकडून प्लाझ्माची सक्ती, खासगी रक्तपेढ्यांशी लागेबांधे

बोलून बातमी शोधा

plasma donors
'मेडिकल'मधील डॉक्टरांकडून प्लाझ्माची सक्ती, खासगी रक्तपेढ्यांशी लागेबांधे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अलिकडे कोरोना उपचारासाठी प्लाझ्मा मागणीचे लोण खासगीतून पुन्हा मेडिकलमध्ये आले आहे. मेडिकलमधील काही डॉक्टर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची गरज असून खासगी पॅथालॉजीतून प्लाझ्मा आणण्याची सक्ती करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून खासगी रक्तपेढ्यांशी डॉक्टरांचे लागेबांधे तर नाही, अशी जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.

कोविड मधून मुक्त झालेल्यांच्या शरीरात विकसित रोगप्रतिकारशक्तीचा (अँटिबॉडीज) आधार घेऊन कोरोनाबाधितांना बरे करता येते, असा अहवाल पुढे आल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे, अशी साद घालत राज्यात 'प्रोजेक्ट प्लॅटिना २०२०' प्रकल्प जून २०२०मध्ये सुरू करण्यात आला. याची जबाबदारी नागपूरच्या मेडिकलवर देण्यात आली. मात्र जून २०२० पासून तर आतापर्यंत प्लाझ्मा प्रकल्पाअंतर्गत प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या अल्प आहे. आतापर्यंत मेयो आणि मेडिकलमध्ये केवळ १०० जणांनी प्लाझ्मा दान केला. या प्लाझ्माचा उपयोग पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून आले. विशेष असे की, मेडिकलमध्ये ज्यांना प्लाझ्मा लावण्यात आला, त्याचा लाभ होत नसल्याचे दिसून आल्यामुळे हळूहळू प्लाझ्मा उपचार पद्धती आपोआपच थंडबस्त्यात पोचली. मात्र प्लझ्मा प्रकल्प खासगी रक्तपेढ्यांनी लावून धरला आहे.

दोन पिशव्यांचा खर्च २० हजार -

प्लाझ्माच्या २०० ग्रॅमच्या एका पिशवीचा दर ८ ते १० हजार रुपये आहे. २०० ग्रॅमच्या दोन पिशव्या २४ तासांमध्ये द्याव्या लागतात. २० हजारांचा भुर्दंड रुग्णांच्या नातेवाइकांवर पडतो. विकृतीशास्त्र विभागातील तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर रुग्ण गंभीर झाल्यानंतर प्लाझ्माचा काहीच उपयोग होत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, खासगीत प्लाझ्माचा धंदा बऱ्यापैकी तेजीत आहे. आता खासगीपाठोपाठ मेडिकलमधील काही डॉक्टरांनी कोविड वॉर्डात दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा लावण्यासंदर्भात सक्ती करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

खासगीमध्ये प्लाझ्माचा धंदा तेजीत -

राज्य सरकारने कोरोनावरील उपाय म्हणून प्लाझ्मा थेरपीचा 'प्रोजेक्ट प्लॅटिना' २०२० मध्ये सुरू केला होता. प्लाझ्मा उपचार पद्धती म्हणून विकसित होत असतानाच प्लाझ्माचे सकारात्मक परिणाम दिसून न आल्यानेच हा प्रकल्प मेडिकलमध्ये बंद पडला. परंतु, पुढे खासगी रुग्णालयांमध्ये प्लाझ्माचा धंदा तेजीत सुरू झाला. खासगी रुग्णालयातील डॉक्टर प्लाझ्मा थेरपीवर भर देऊ लागले आहेत. रुग्ण गंभीरावस्थेत असल्यास त्याला थेट प्लाझ्मा लावण्याची सक्ती डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

  • जिल्ह्यातील बाधित - ४ लाखांपर्यंत

  • कोरोनामुक्त -३ लाखांपर्यंत

  • प्लाझ्मा डोनर - १००

आमचा रुग्ण मेडिकलमध्ये दाखल आहे. आम्हाला प्लाझ्मा आणा, असे डॉक्टरांनी सांगितले. खासगीतून २० हजार रुपये खर्चून आम्ही प्लाझ्मा कसा आणू? आमची आर्थिक स्थिती नाही. ही तर डॉक्टरांकडून छुप्या पद्धतीने होणारी आर्थिक लुट आहे.
-अनिकेत कुत्तरमारे, समता सैनिक दल, नागपूर.