esakal | घरातील तिघांनाही कोरोनानं ग्रासलं, पण इच्छाशक्तीच्या जोरावर केली मात
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

घरातील तिघांनाही कोरोनानं ग्रासलं, पण इच्छाशक्तीच्या जोरावर केली मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या भीषण लाटेत अनेक डॉक्टर्स व नर्सेस सध्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांमध्ये वावरताना त्यांनाही नकळत या आजाराची लागण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्योती मदने या त्यापैकीच एक. त्यांनी रुग्णालयात भरती न होता घरीच नियमित उपचार घेऊन कोरोनावर मात केली. त्या स्वतःच कोरोनामुक्त झाल्या नाही तर आपल्या आईवडिलांनाही त्यांनी या आजारातून सहीसलामत बाहेर काढले.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

मेडिकलमध्ये स्टाफ नर्स असलेल्या ज्योती यांची कोविड आयसीसीयू वॉर्डात ड्युटी होती. एकेदिवशी ड्युटी करून घरी परतल्यानंतर कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. एचआरसीटी लेव्हल तीनपर्यंत आली होती. मात्र, घाबरून न जाता त्यांनी लगेच स्वतःला विलगीकरण केले. स्वतः नर्स असल्यामुळे त्या उपचारासाठी मेडिकलमध्ये जाऊ शकल्या असत्या. मात्र, हॉस्पिटलमध्ये असलेली प्रचंड गर्दी आणि बेडच्या कमतरतेमुळे त्यांनी घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. विलगीकरणात असताना त्यांनी रूटीनचा चार्ट तयार करून तो नियमित पाळला. सकाळी उठल्यानंतर चहा, नाश्ता, गरम पाण्याची वाफ, कोमट पाण्याची गुळल्या व औषध घेतानाच ऑक्सिमीटरच्या मदतीने ऑक्सिजन लेव्हल व पल्स चेक करत २६ दिवसांच्या संघर्षानंतर त्यांनी कोरोनाला हरविले आणि ठीक होऊन पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या. त्याअगोदर ज्योती यांचे आईवडीलही पॉझिटिव्ह आले होते. 'सॅच्युरेशन लेव्हल' कमी झाल्याने वडिलांची तब्येत खूपच खालावली होती. मात्र, न डगमगता त्यांनी घरीच उपचार करून दोघांनाही या जीवघेण्या आजारातून बाहेर काढले.

बहिणीच्या लग्नालाही जाता आले नाही -

मूळच्या सांगली येथील ज्योती यांनी आतापर्यंत ड्युटीला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आहे. ड्युटी आणि लॉकडाउनमुळे त्यांना सख्ख्या बहिणीच्या लग्नालाही जाता आले नाही. या गोष्टीचे त्यांनाही वाईट वाटले. मात्र, परिस्थिती आणीबाणीची असल्याने इच्छेला बाजूला सारत रुग्णसेवेला महत्त्व दिले. 'कोविड योद्धा' म्हणून अनेकांना त्याग करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले

loading image