'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hrct test

'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

नागपूर : कोरोनाबाधिताशी संपर्क आल्यानंतर कोरोनासदृश्य लक्षणे आढळताच आरटीपीसीआर करावी. मात्र, कोरोना चाचणी निगेटिव्ह असूनही लक्षणे असतील, तर पाच दिवसांनी एचआरसीटी करावी. आरटीपीसीआर आणि सीटी स्कॅन एकाच दिवशी सुरुवातीलाच करू नये. प्रारंभी फुप्फुसांत संसर्ग दिसत नाही, अशी माहिती मेडिकल-सूपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे श्वसनरोग विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.

कोरोनाची अनेक नवी लक्षणे दिसत आहेत. लोकांच्या मनात याबद्दल भीती आणि संभ्रम आहे. इतर विषाणूजन्य आजारांप्रमाणे सर्दी, खोकला, पडसे, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे आता दिसतात. अगोदर डोकेदुखी, पायदुखी ही लक्षणे नव्हती. आता डायरिया, कंजक्टिव्हायटिस पण लक्षणे आहेत. डोळ्यांतून संसर्गाचा धोका आहे. विषाणू जसजसे बदल करून घेतो तशी लक्षणे बदलतात. कोरोना आजार दीड वर्षापूर्वीचा आहे. हळूहळू याबद्दलची माहिती कळेल. त्या-त्या परिस्थितीत या आजाराची लक्षणे निश्चित होतील. यामुळे प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे. सातत्याने मास्कचा वापर करा, कोविड प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करा, सतत हात धूत राहा. याशिवाय लक्षणे असतील, कोरोना रुग्णाशी संपर्क आला असेल तर स्वत:ला कोरोना रुग्ण मानून तसेच वागा. स्वत:ला वेगळे ठेवा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.

यावेळी गंभीर लक्षणांबाबत डॉ. मेश्राम यांना विचारले असता, साधी सर्दी-ताप, अंगदुखी ही आजाराची साधी लक्षणे आहेत. मात्र, जर ताप सात दिवसांहून अधिक काळ राहिला, खोकलाही कमी होत नसेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर आजार गंभीर आहे लक्षात घेण्याची गरज आहे. तत्काळ कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज आहे. सध्या आरटी-पीसीआर सर्वात प्रभावी चाचणी आहे. समजा पहिल्यांदा आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आला. लक्षणे असतील तर ५ दिवसांनंतर छातीचा सीटी स्कॅन करून संसर्ग कळू शकतो. त्यानंतर पुन्हा आरटी पीसीआर केल्यास कळून येते.

कोरोना 'हे' संसर्गजन्य युद्ध -

कोरोना हे 'संसर्गजन्य युद्ध' ते सामान्यांसाठी अवघड आहे. सध्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलाय. त्यामळे प्रत्येकाने आपली मानसिक तयारी करावी. स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्षम करावे. त्यासाठी स्वतःची काळजी घेणे, उत्तम आहार आणि विहाराची गरज आहे. सकारात्मक विचार करणे, आपल्या जवळच्या माणसांशी संवाद ठेवावा. स्वतःला ताण-तणावमुक्त ठेवणे, सुसंवादावर भर देण्याची गरज आहे. स्वच्छतेला प्राधान्य देणे, मास्क सॅनिटायझर हे मित्र म्हणून सोबत बाळगावे. यापुढे आपल्या प्रसन्न आयुष्याची चतु:सूत्री अशीच असणार आहे. मुळीच घाबरू नका. निर्भयपणे परिस्थितीवर सहज मात करता येते, असे मेडिकल-सुपरच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nagpur