esakal | बाबांचा स्कोअर १४ अन् आईला मधुमेह, घरातील ७ सदस्यांना कोरोना; पण भीती न ठेवता केली मात

बोलून बातमी शोधा

Corona
बाबांचा स्कोअर १४ अन् आईला मधुमेह, घरातील ७ सदस्यांना कोरोना; पण भीती न ठेवता केली मात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : परिवारातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की अख्खं कुटुंब घाबरून जातं. अशावेळी काय करावं सुचत नाही. मात्र, एकाच घरातील सर्व जण कोरोनाने बाधित झाल्यास त्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करवत नाही. हा भयानक प्रसंग शिवाजीनगरात राहणाऱ्या गोखले परिवाराने अनुभवला. त्यांनी कोरोनाची भीती न बाळगता घरीच योग्य उपचार घेऊन या जीवघेण्या आजारावर यशस्वीरीत्या मात केली.

हेही वाचा: वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

जानेवारीत दुसऱ्या लाटेत गोखले कुटुंब कोरोनाच्या कचाट्यात सापडले. परिवारातील आठपैकी तब्बल सात जणांना एकाचवेळी कोरोनाची लागण झाली. मात्र, या अटीतटीच्या प्रसंगी घाबरून न जाता त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. अनुभव सांगताना माजी राष्ट्रीय बास्केटबॉलपटू व शिवछत्रपती पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले म्हणाले, की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अचानक एक दिवस मला ताप आला.नियमित तापाच्या व अंगदुखीच्या गोळ्या घेतल्या आणि दोन दिवसांत बरं वाटायला लागलं. आपल्याला कोरोना असेल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यानंतर साहजिकच नेहमीप्रमाणे पुन्हा खेळाडूंची प्रॅक्टिस घेण्यासाठी मैदानावर गेलो आणि जात होतो. साधारण तीन-चार दिवसांनी पत्नीने (अलका) फोडणीचा वास येत नसल्याची तक्रार केली. वास न येणे हे कोविडचे लक्षण असल्याने लगेच तिला चाचणी करायला लॅबमध्ये घेऊन गेलो. टेन्शनची खरी सुरवात तेथूनच झाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे घरातील सगळ्यांचीच चाचणी केली. त्यात मी, मुलगी शलाका, ८० वर्षीय वडील अशोक व ७८ वर्षीय आई संयुक्तासह भाऊ शाश्वत व त्याची मुलगी शर्वरी असे घरातील आठपैकी सात जण पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

नियमित उपचाराचा झाला लाभ -

अचानक कुटुंबातील इतके जण पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही घाबरून गेलो होतो. वडिलांचा सिटी स्कोअर १४/२५, तर आईला मधुमेहाचा आजार. आता करायचं काय असा प्रश्न मनात आला. कुणीच घराबाहेर पडू शकत नव्हतो. मात्र, खेळाडू म्हणून जिद्द न सोडता लढायचं ठरवलं. प्रचंड मानसिक दबाव होता. त्यावेळी डॉक्टर असलेल्या माझ्या मावसभावाने (डॉ. आशीष अन्वीकर) मार्गदर्शन केले. बाबांना हॉस्पिटलमध्ये भरती न करता घरीच उपचार करण्याचा सल्ला दिला. तो स्वतः दररोज येऊन तपासणी करून औषधे देत होता. अखेर दोन आठवड्यांच्या नियमित उपचारानंतर आम्ही सर्व जण कोरोनामुक्त झालो.

सकारात्मक राहणे आवश्यक -

कोरोना झाल्यानंतर सकारात्मक राहणे अतिशय आवश्यक आहे. जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती व योग्यवेळी प्रभावी उपचार केल्यास कोरोनावर सहज मात करता येऊ शकते. पंधरा दिवसांच्या अनुभवातून आम्ही तेच शिकलो, असे मत गोखले यांनी व्यक्त केले.