esakal | जावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी : मिलिंद परांडे
sakal

बोलून बातमी शोधा

milind parande

जावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी : मिलिंद परांडे

sakal_logo
By
राजेश प्रायकर @rajeshp_sakal

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची तुलना तालिबान्यांशी केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी आज पत्रकारपरिषदेत केली. एवढेच नव्हे 'एम्पायर’ सिरिजमधून मंदिरे पाडणाऱ्या बाबरचे उदात्तीकरण होत असून ती बंद करण्यात यावी, असेही ते म्हणाले. त्यांनी ‘बजरंगी भाईजान’ व ‘न्यूयॉर्क’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्याही व्यक्तव्याचा समाचार घेतला.

धंतोली येथील विहिंप कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. जावेद अख्तर कवी असून प्रसिद्ध चेहरा आहे. त्यांचे वक्तव्य देशातील सौहार्दाच्या वातावरणाला सुरुंग लावणारे व पूर्वग्रहदूषित भावनेने प्रेरित आहे. त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे परांडे म्हणाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविण्यात येत असलेल्या ‘एम्पायर’ सिरिजमधून भारतावर आक्रमण करून श्रीराम जन्मभूमी पाडणाऱ्या बाबरचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रनिर्माता म्हणून दाखविल्या जात आहे.

हेही वाचा: राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश घट; 16 टक्के गंभीर रुग्ण

देशातील हिंदूमध्ये भ्रम पसरविण्याचा हा प्रकार आहे. नुकताच शहरात हिंदू तरुणींना जबरदस्तीने बुरखा घालण्यात आला. याविरोधात विहिंपने तक्रार केली. पोलिसांनी संबंधितांकडून माफीनामा घेतला. जबरदस्तीने हिंदू मुलींना बुरखा घालण्यास लावणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. परंतु सरकार या गंभीर प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. हे सर्व प्रकार हिंदू समाजाची आस्था, परंपरा, संस्कृती मिटविण्याचा प्रकार आहे.

हिंदू समाज हे सहन करणार नाही. अशा घटनांविरोधात संबंधित राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दिग्दर्शक कबीर खान यांनी मुघलांना राष्ट्रनिर्माते असल्याचे सांगितले होते. त्यांच्याही वक्तव्याचा परांडे यांनी खरपूस समाचार घेतला. कबीर खान भारतावर आक्रमण करणाऱ्यांचे उदात्तीकरण करीत असल्याचे ते म्हणाले.

डिसेंबर २०२३ पर्यंत प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात

नुकताच अयोध्या येथील श्री राम मंदिराचे काम बघण्याचा योग आला. पायाचे काम वेगाने सुरू आहे. ते बघता डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीराम यांची मूर्ती गर्भगृहात असेल, असे ते म्हणाले. मूर्तीच्या स्थापनेनंतरही मंदिराचे काम सुरू राहील. मंदिर पूर्ण होण्यास काही अवधी लागेल, असेही ते म्हणाले.

loading image
go to top