esakal | Nagpur : दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान

Nagpur : दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधील दोन लाखांवर अधिक हेक्टर शेतीतील पीक उद्‌ध्वस्त झाले आहे. सोयाबीन व कापसाच्या पिकाचा त्यात सर्वाधिक समावेश आहे. मालेगाव येथील शिक्षक दादाराव अवचार यांनी या परिस्थितीवर लिहिलेल्या त्यांच्या कवितेत म्हटल्यानुसार ‘स्वप्न उद्याचे गोठले, आभाळच सारे फाटले...’ अशीच स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण विदर्भात पावसाने थैमान घातले. अनेक तालुक्यांतील शेतपिके खरडून गेलीत व पिकांनादेखील फटका बसला. या संकटातून शेतकरी बाहेर येत नाहीत व पिके जोमात असतानाच ऐन काढणीच्या वेळी सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत पावसाने झोडपून काढले. अकोला जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसामुळे एक लाख ४२ हजार ७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे नऊ हजार ३८.०७ हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली. जिल्ह्यातील एक हजार ६६९ गावेही बाधित झाली. १० हजार २३६ घरांचे नुकसान झाले असून, त्यापैकी नऊ हजार ९६५ घरांचे अंशत: तर २७१ घरांची पूर्णत: हानी झाली.

वाशीम जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड व वाशीम तालुक्यात ६५ मिलिमीटर पाऊस पडला आहे; तर, रिसोड तालुक्यातील ७२ गावांना पैनगंगा नदीच्या पुराचा फटका बसला. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठची शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. प्रशासनाकडे अजूनही नुकसानाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. वाशीम, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात शेतातील सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने सोयाबीनला झाडावरच कोंब फुटल्याने या तालुक्यातील पन्नास टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे

अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसात प्राथमिक अंदाजानुसार खरीप हंगामातील तब्बल १ लाख २६ हजार ६९४ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. दोन दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरत असून नुकसानीची गंभीरता आता समोर येत आहे. त्यातही सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून ते ८८,०३६ हेक्टर क्षेत्र इतके आहे. १९,९२६ हेक्टर मधील कपाशीचे, तर १२,६६७ हेक्टरमधील तुरीचे मुकसान झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यात संततधारमुळे सोयाबीनला अक्षरक्ष; कोंबं फुटली, तर कापसाची बोंडेही सडली. कापूस, सोयाबीनसोबतच तूर, उडीद, मूग या शेतपिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सहा हजार ४६१ हेक्टर क्षेत्रातील कापूस, तर दोन हजार ६७६ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनचे या पावसाने नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यातील ३३ हजार ९९ हेक्टर क्षेत्रातील पिकांची ३३ टक्क्यांहून अधिक हानी झाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे व साचल्यामुळे नुकसान झाले. ९ तालुक्यातील ५२० गावे बाधित झाली. या पावसाने किती हेक्टर क्षेत्र बाधित झाले याची मोजदाद अद्याप करण्यात आलेली नाही. तथापि सोंगलेला व गंजी लावून ठेवलेला सोयाबीन या पावसाने खराब झाला आहे. मुग व उडीद हातचा गेला असून कापसावर बोंडसड व गुलाबी अळींचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे यावेळी झालेली हानी सुद्धा प्रचंड मोठी असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. त्यावर मालेगांव (जि. वाशीम) येथील शिक्षक दादाराव अवचार यांनी लिहिलेली कविता...

शेतकऱ्याची व्यथा..

हातातला घास हिरावला

निसर्ग पुन्हा दुरावला...

काबाडकष्ट गेले वाया

करपली बळीची काया....

सोयाबीनला फुटले कोंब

आसवांचे नयनी थेंब....

स्वप्न उद्याचे गोठले

आभाळच सारे फाटले....

शेतकऱ्याची व्यथा काय

भरवशाचे कुणीच नाय

सरकार नित्य नाडवते

अन् निसर्ग नेहमी रडवते

loading image
go to top