esakal | कुणाच्या काखेर कॅलिपर तर कुणाचा लंगडतच रॅम्पवाॅक, न लाजता गाजवली फॅशन शो स्पर्धा  
sakal

बोलून बातमी शोधा

handicapped students super presentation in Mr. and Miss Fashion and Modeling Show

विदर्भातील दिव्यांग व्यक्तींमधील न्यूनगंड दूर करणे व त्यांच्यातील टॅलेंटला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने यावेळी प्रथमच शोमध्ये दिव्यांगांना संधी देण्यात आली होती. 

कुणाच्या काखेर कॅलिपर तर कुणाचा लंगडतच रॅम्पवाॅक, न लाजता गाजवली फॅशन शो स्पर्धा  

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर  : कुणी काखेत कॅलिपर घेऊन चालले, तर कुणी दुसऱ्याची मदत घेऊन सुटबुटात 'वॉक' केला. कुणाचे पोलिओच्या आजारामुळे पाय तिरपे, तर कुणी कंबरेखाली लुळे असल्याने लंगडत जमिनीवर घासताना दिसले. शारीरिक व्यंगांची लाज न बाळगता ऐटीत रॅम्पवर धमाल करत नागपूरकरांची वाहवा मिळविली. निमित्त होते 'मिस्टर अँड मिस २०२० फॅशन व मॉडेलिंग शो'चे.

ट्रिपल फाइव्ह एंटरटेन्मेंट ग्रुपतर्फे वर्धमाननगर येथील अविस फिटनेस स्टुडिओ व ग्लोबल दिव्यांग फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित हा शो नुकताच वर्धा रोडवरील जामठास्थित अयोरा पाम्स येथे पार पडला. विदर्भातील दिव्यांग व्यक्तींमधील न्यूनगंड दूर करणे व त्यांच्यातील टॅलेंटला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने यावेळी प्रथमच शोमध्ये दिव्यांगांना संधी देण्यात आली होती. 

अधिक वाचा - अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण

सायंकाळच्या गुलाबी थंडीत व रंगबिरंगी लायटिंगमध्ये झालेल्या या शोमध्ये विदर्भातील ५० युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. डझनभर दिव्यांग पुरुष व महिलांनीही यात भाग घेतला. यावेळी दिव्यांगांनी नटूनथटून, साज शृंगार करून खास वेशभूषेत रॅम्पवर वॉक करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनीही जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले, त्यांना प्रोत्साहन दिले.

संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास आम्हीही सर्वसामान्यांच्या तुलनेत टॅलेंटमध्ये कुठेच कमी नाही, हे यानिमित्ताने दिव्यांगांनी दाखवून दिले. सहभागी स्पर्धकांमध्ये काही जन्मतःच अपंग होते, तर काहींना अपघातात व्यंगत्व आले. एका अनोख्या शोमध्ये सहभागी झाल्याचा आनंद यावेळी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर दिसून आला. काही काळासाठी का होईना ते आपले दुःख विसरले. 

बहुतेकांसाठी हा पहिलाच अनुभव होता. दिव्यांगांचे कुटुंबीयही यावेळी आवर्जून उपस्थित होते. शोमध्ये सहभागी युवक-युवतींनी ऑडिशनद्वारे निवड करण्यात आली. त्यांचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत स्टुडिओमध्ये ग्रुमिंगही करण्यात आले. या अनोख्या शोमध्ये मिसेस इंडिया उपविजेती एकता भैय्या, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ शिशिर पळसपुरे व कलावंत जितेंद्र भारद्वाज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

अधिक माहितीसाठी - डॉ. शीतल आमटे- करजगी यांचं शेवटचं चॅटिंग कुणाशी? पासवर्ड स्वतःचे डोळे ठेवल्यानं वाढल्या अडचणी
 

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना 'मिस्टर अँड मिस' किताबासह विविध पुरस्कार देण्यात आले. दिव्यांगांनाही मेडल्स देऊन गौरविण्यात आले. शोचे उदघाटन आमदार मोहन मते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जितेंद्र भारद्वाज, रवी मेहाडिया, अतुल टिकले, आयोजक अजिंक्य वखरे, फाउंडेशनचे संस्थापक मनोज धोटे, अविस स्टुडिओचे संचालक स्वप्निल वाघुळे, मयूर दुर्गे, धनंजय उपासनी आदी उपस्थित होते.


पीयूष, वेदंतीला किताब

या शोमध्ये नागपूरचा पीयूष बारापात्रे व अमरावतीची वेदंती पाटील यांनी अनुक्रमे मिस्टर आणि मिस विदर्भ किताब पटकावला. पुरुषांमध्ये अक्षय दमाये व बंटी वाधवानीने आणि महिलांमध्ये सिल्व्हिया जॉन व गुंजन पळसापुरे यांनी उपविजेतेपद व तृतीय स्थान मिळविले.

 
दिव्यांगांमधील टॅलेंट जगाला दाखवून द्यायचे आहे
समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. दिव्यांग हे फक्त मागत असतात, अशीच त्यांची प्रतिमा बनली आहे. ग्लोबल दिव्यांग फाउंडेशनला हे चित्र बदलवायचे आहे. दिव्यांगांमधील टॅलेंट जगाला दाखवून द्यायचे आहे. फॅशन व मॉडेलिंग शो त्याचाच एक भाग होता.
मनोज धोटे, फाउंडेशनचे संस्थापक

संपादित : अतुल मांगे