हिंदूत्व कट्टरता नव्हे विचारधारा : डॉ. मनमोहन वैद्य

manmohan vaidya
manmohan vaidya

नागपूर : काही लोक हिंदूत्वाला कट्टरतेशी जोडतात. मात्र कट्टरता हा शब्द कम्युनिझममधून आलेला असून, हिंदू व्यक्‍ती त्याच्या विचारांशी निष्ठावान असतो. ही एक दृष्टी व तत्त्वज्ञानाचे सांस्कृतिक बिज असून याचा संबंध कट्टरवादाशी जोडणे योग्य राहणार नाही. हिंदूत्वाला उपमा देण्यासाठी भारतीय भाषांचाच उपयोग झाल्यास हिंदूत्वाचे महत्व कायम राहील, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्‍त केले. 

झील फाऊंडेशनच्या दुसऱ्या द्विदिवसीय नागपूर लिटररी फेस्टीव्हलचे उद्‌घाटन डॉ. मनमोहनजी वैद्य यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. उत्तर अंबाझरी मार्गावरील सोहम सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे. याप्रसंगी व्यासपीठावर महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. रजनीश शुक्‍ल, ज्येष्ठ लेखक सच्चिदानंद जोशी, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, जनरल ए.एस. देव व झील फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय देशपांडे उपस्थित होते. 

नागपूर लिटररी फेस्टिव्हलचे उद्घाटन 
उपासना पद्धती भारतीयांच्या आचरणाचा भाग आहे. आपल्याकडे देण्याच्या वृत्तीला, कर्तव्याला, जबाबदारीला धर्म संबोधले जाते. धर्माची संकल्पना जोडण्याशी निगडित असून, तोडणे शिकविले जात नसल्याचे डॉ. वैद्य म्हाणाले. जो समाज राज्यव्यवस्थेवर निर्भर असलेला निस्तेज असतो. म्हणून पुरुषार्थ कमावण्याची सवय समाजाला लावावी लागेल, असे आवाहन वैद्य यांनी केले.

पाश्‍चिमात्यांना आपले विचार, आपली संस्कृती इतरांवर थोपण्याची सवय असते. प्रत्येकाची विचारप्रणाली भिन्न असून, त्यातूनच शब्दांची निर्मिती होत असते. त्यामुळे, आपल्या स्वभावाला परिचायक असलेल्या आपल्याच शब्दांचा वापर आपण करणे योग्य ठरेल. पश्‍चिमेकडील शब्दांचे अनुवाद आपल्या भावनेशी निगडित शब्दांशी जोडले तर विपर्यास होईल.

येथील संस्कृतीत जिवनाचे चिंतन आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच भारत एक व्यक्तीमत्त्व म्हणून उदयास येतो. "टॉलरन्स' हा शब्द आपल्यासाठी अत्यंत गौण आहे. मात्र, तो आजकाल सर्रास वापरला जात आहे. आपल्याला त्या शब्दाच्या अर्थाच्या पलिकडे जाऊन विचार करावा लागणार असून, भारतीय विचार विभक्त होण्याचा नाही तर सामावून घेण्याचा असल्याचे मत डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार सई देशपांडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com