esakal | उमरेड कऱ्हांडला वनक्षेत्राला जाळरेषाच नाही, कसे करणार वणव्यापासून संरक्षण? करा 'हे' उपाय

बोलून बातमी शोधा

how to escape forest from fire nagpur news

शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक आत जाऊन आगी लावत असल्याने जंगलांना आग लागते. जंगलाजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी

उमरेड कऱ्हांडला वनक्षेत्राला जाळरेषाच नाही, कसे करणार वणव्यापासून संरक्षण? करा 'हे' उपाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेलतूर (जि. नागपूर) : वनक्षेत्राला वणवा लागू नये, यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात वनक्षेत्राभोवती जाळरेषा तयार केली जाते. वन क्षेत्रातील वन्यप्राणी, पक्ष्यांसाठी जाळरेषा हे सुरक्षाकवच असते. मात्र, कुही-उमरेड-भिवापूर तालुक्यातील वनक्षेत्राभोवती अद्यापही जाळरेषा तयार केली नसल्याने वणवा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, ही आग किंवा वणवा लागूच नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी.

वणव्याचे परिणाम -
उन्हाळा सुरू झाला की, वन विभागाला जंगलास आग लागू नये, म्हणून जंगलांच्या कडेच्या सर्व बाजूने चर खोदून जाळरेषा तयार केली जाते. वनक्षेत्रात आग पसरू नये म्हणून रस्त्याच्या बाजूचे गवत जाळून टाकले जाते. जाळरेषेमुळे जंगल सुरक्षित राहते. तालुक्यातील एकही वनपरिश्रेत्रात अशी जाळरेषा घेतलेली नाही. यामुळे जंगलास आग लागली तर वनक्षेत्राचे मोठे नुकसान होऊ शकते. वणवा लागल्यानंतर वनक्षेत्रातील झाडे, पशुपक्षी होरपळून मृत्युमुखी पावतात. वणव्यांमध्ये कित्येक जातींचे कीटक, सरपटणारे प्राणी आगीत भस्मसात होतात. वन्यप्राणी व वनक्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन अधिकाऱ्यांची आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उन्हाळा सुरू होऊनही जाळरेषा तयार केली नसल्याने अभयारण्यातील वन्यप्राण्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. 
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात तारणा, चिकना शिवारात वणवा लागल्याने काही एकर जंगल जळून गेले होते. यामध्ये वन्यजीवांचे प्राण गेले होते. या घटनेतून न विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणताच बोध घेतला नसल्याचे दिसते. अशा घटनांसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. 

हेही वाचा - आदेशानुसारच 'अवनी'ची हत्या; वन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करता येणार नाही, सर्वोच्च...

कागदोपत्री बिले काढली जातात - 
वनक्षेत्राभोवती जाळरेषा तयार करण्यासाठी दरवर्षी सुमारे दहा लाखांचा निधी प्राप्त होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांतून उघड झाली आहे. वनविभागाचे अधिकारी मजुरांमार्फत मोजक्या ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करतात. मात्र, त्याचा निधी फक्त कागदपत्रांची पूर्तता करून काढला जातो. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आहे.

वणवा रोखण्यासाठी काय करायला हवे? -

  • वनात स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी आग पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे.
  • वनात बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नये. 
  • वनातील अथवा वनालगतच्या शेतातील वनोपज गोळा करण्यासाठी त्या झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.
  • रात्री वनातून जाताना हातात टेभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. त्या ऐवजी बॅटरी घेऊन जावे.
  • वनालगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये.

हेही वाचा - बापरे! दंड भरून करताहेत लग्न, आता नियमांचा भंग केल्यास थेट मंगल कार्यालयच होणार सील

प्रतिबंधात्क उपाय -

  • शासकीय व खासगी जंगलात सहा व बारा मीटरच्या जाळरेषा काढणे.
  • मोठमोठ्या जंगलात आग निरीक्षण मनोरा उभारणे.
  • रस्त्याच्या दुतर्फा सहा मीटरची जाळरेषा काढणे, जाळरेषेवर पडलेला पालापाचोळा वारंवार झाडणे.
  • आगीचा धूर दिसताच याबाबत जवळच्या वनाधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना याची  माहिती देणे.

आग लावणाऱ्यांवर दंड -
शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक आत जाऊन आगी लावत असल्याने जंगलांना आग लागते. जंगलाजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांना ५०० रुपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.