esakal | नोंदणी व मुद्रांक विभागात नेमकी रिक्त पदे किती? माहितीमध्ये तफावत
sakal

बोलून बातमी शोधा

Job

नोंदणी व मुद्रांक विभागात नेमकी रिक्त पदे किती? माहितीमध्ये तफावत

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात (registration and stamp duty department) गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र, ती पदे नेमकी किती रिक्त आहेत, याबाबत विभागच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. स्वतः विभागाने प्रकाशित केलेल्या माहितीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची संख्या आणि माहितीच्या अधिकारात देण्यात आलेल्या रिक्त जागांमध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे. (how many vacancies in registration and stamp duty department in maharashtra)

हेही वाचा: ...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

गेल्या २५ वर्षांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात रिक्त पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. काही दिवसांपूर्वी विभागातील पदांबाबत माहिती समोर आली. त्यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-१) आणि मुद्रांक निरीक्षक या (गट ब)(अराजपत्रित) पदामधील ३९३ जागा तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक (गट क) या पदाच्या ३९६ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली. मात्र, २५ वर्षांपासून ज्या विभागाची पदभरतीच झालेली नाही, त्या विभागात इतकी कमी पदे रिक्त कशी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे सूरज गज्जलवार यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकाच्या पुणे कार्यालयात सादर केला. मात्र, मिळालेल्या माहितीमुळे हा संभ्रम अधिकच वाढल्याचे दिसून आले. दिलेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधकांची १३८ तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षकांची (गट क) ४६ जागा रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नेमक्या जागा किती याची माहिती विभागाकडे नाही काय? असा प्रश्‍न निर्माण होतोय.

सरकारने लक्ष द्यावे -

गेल्या २५ वर्षापासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पदभरतीसाठी कुठलीच परीक्षा घेण्यात आली नाही. मात्र, विद्यार्थी या परीक्षांसाठी जाहीरात येईल या आशेपोटी सातत्याने अभ्यास करतात. त्यामुळे या पदाच्या भरतीकडे राज्य सरकारने लक्ष देण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार आहे.

दोन्ही माहितीत तफावत असल्याने नेमकी पदाची संख्या किती याबाबत अद्यापही नेमकी माहिती समोर येत नाही. तेव्हा खरी माहिती समोर यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.
-सूरज गज्जलवार, माहिती अधिकार कार्यकर्ता.
loading image