esakal | ...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : बारा वर्षीय मुलगा... अचानक आवाज आल्याने झोपेतून उठला... बघतो तर काय फॅनला आईचा मृतदेह अडकलेला... तो रडायला लागला... त्याने लगेच उमरेडमध्ये राहणाऱ्या मामाला व्हिडिओ कॉल केला... रडतच मामाला व्हिडिओ कॉलवरून आईचा गळफास घेतलेला मृतदेह (Woman commits suicide) दाखवला... मामाने लगेच गाडी काढली आणि बहिणीच्या घरी पोहोचला... त्याने भाच्याला कवेत घेतले आणि पोलिसांना फोन करून बहिणीच्या आत्महत्येची माहिती दिली... ही हृदय पिळवून टाकणारी घटना आज नंदनवनमध्ये उघडकीस आली. प्रेरणा नारायण भीवनकर (४०, रा. देवलक्ष्मी अपार्टमेंट, नंदनवन) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. (Woman-commits-suicide-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. तेव्हापासून त्या १२ वर्षीय मुलासह देवलक्ष्मी अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहायच्या. त्या खासगी काम करायच्या. त्यांचे भाऊ नागेश भिवनकर हे उमरेड येथे राहातात. गत काही दिवसांपासून प्रेरणा या तणावात होत्या.

मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रेरणा यांनी भाऊ नागेश यांना फोन केला. ‘मुलाला सोबत घेऊन जा, असे त्या नागेश यांना म्हणाल्या. ‘आता रात्र झाली आहे. उद्या, सकाळी बोलू ,’ असे नागेश हे प्रेरणा यांना म्हणाले. जेवण करून प्रेरणा यांचा मुलगा झोपला. रात्री ८.३५ वाजताच्या सुमारास प्रेरणा यांनी पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. स्टूलचा आवाज आल्याने प्रेरणा यांचा मुलगा जागा झाला. त्याला आई गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली.

हेही वाचा: ‘कमळ’ बेपत्ता? अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची नामुष्की

मुलाने मामाला व्हिडिओ कॉल केला. आईने गळफास घेतल्याचे दाखविले. नागेश यांना जबर धक्का बसला. त्यांनी भाच्याला धीर दिला. नागपुरातील नातेवाइकांना माहिती देत उमेरडहून नागपूरकडे रवाना झाले. नागेश नागपुरात पोहोचले. त्यांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. आर. राऊत यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

(Woman-commits-suicide-in-Nagpur)

loading image
go to top