नागपूर : राजस्थानपेक्षाही विदर्भात जास्त तापमान कसे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तापमान मोजणारे यंत्र

नागपूर : राजस्थानपेक्षाही विदर्भात जास्त तापमान कसे?

नागपूर - ग्लाोबल वार्मिंगमुळे काय फक्त चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीचेच तापमान सर्वाधिक असते? राजस्थानपेक्षाही विदर्भात जास्त तापमानाची नोंद कशी होते? याचे खरे कारण म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान मोजणारी यंत्रे. ती चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आली आहेत. त्यामुळेच तापमानाचे आकडे फुगत चालले, असा खळबळजनक दावा हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला. चंद्रपूर येथील चोपणे ३५ वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करीत आहेत. ते म्हणाले, गेल्या महिन्यात अकोला, चंद्रपूर आणि ब्रम्हपुरीचे कमाल तापमान संपूर्ण जगात सर्वाधिक ठरले होते. त्याची देशभर चर्चा झाली. भरमसाठ वृक्षतोड, सिमेंटचे वाढलेले बांधकाम, खाणकाम, कारखाने व वाहनांमधून निघणारा विषारी धूर यामुळे तापमान वाढत असले तरी, ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सदोष तापमानमापक यंत्रांमुळेही जादा तापमानाची नोंद होत आहे, असा निष्कर्ष प्रा. चोपणे नोंदवितात.

दीड अंशाने वाढतो पारा

प्रा. चोपणे यांच्या मते, अकोला, चंद्रपूर आणि ब्रम्हपुरीपुरता विचार केल्यास या तिन्ही ठिकाणी तापमानमापक यंत्रे भर वस्तीतील तहसील व जिल्हा कार्यालयात आहेत. त्यामुळे येथील तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा एक ते दीड अंशाने अधिक असते. पारा ४६-४७ अंशांवर जाण्याचे हे मुख्य कारण आहे. ब्रम्हपुरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. तिथे तरी तापमान कमी असायला पाहिजे. मात्र परिस्थिती याउलट आहे.

नाॅर्म्सचे पालन नाही

तापमानमापक यंत्रे भारतीय हवामान विभागाच्या नॉर्म्सनुसार शहराच्या बाहेर मोकळ्या जागेत हवीत. तेव्हाच अचूक आकडे (डेटा) येतात. दुर्दैवाने तिन्ही ठिकाणी असे नाही. केवळ नागपूर आणि अन्य एक-दोन ठिकाणीच योग्य ठिकाणी यंत्रे बसविण्यात आली आहेत. जोपर्यंत यात दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत असेच तापमानाचे विक्रमी आकडे येत राहणार आहे. केंद्राकडून पुरेसा निधी मिळाल्यास नवे आधुनिक यंत्रे बसून भविष्यात तापमानाचे अचूक आकडे मिळू शकतील, अशी आशाही चोपणे यांनी व्यक्त केली.

१६ वर्षांपूर्वी चंद्रपूरचा पारा गेला होता ४९ डिग्रीवर

विदर्भातील तापमानाच्या आकड्यांबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता राहिली आहे. येथील तापमानाने देशात नवनवे उच्चांक नोंदविले आहेत. १६ वर्षांपूर्वी २ जून २००७ रोजी चंद्रपूरचा पारा तब्बल ४९ डिग्रीवर गेला होता. विदर्भाच्या इतिहासातील तो सर्वात उष्ण दिवस ठरला होता. तर नागपुरात १९ मे २०१५ रोजी कमाल तापमानाने ४८ अंशांचा उच्चांक गाठला होता.

तापमानमापक यंत्रे योग्य ठिकाणी लावण्याविषयी आम्ही वारंवार स्थानिक प्रशासनाकडे मागणी व तक्रार केली. हवामान विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्याच्याही लक्षात आणून दिले. तरी सुद्धा हा विषय गांभीर्याने घेतला नाही.

- प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक.

Web Title: How Tempreture High In Vidarbh Than Rajasthan Pro Suresh Chopane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top