‘भाजपचा गड’ हा इतिहास; निवडणुकीपूर्वीच असे का म्हणाले बाळासाहेब थोरात

If the NCP has any grievances it will be removed
If the NCP has any grievances it will be removed

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने तरुण तडफदार उमेदवार दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात अभिजित वंजारी यांच्या रूपाने विजय आमचाच होईल, असा विश्‍वास राज्याचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थोरात नागपुरात आले आहेत.

एक डिसेंबरला नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस आहे. वंजारींचा अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. त्यांचा चांगला कॉन्टॅक्ट आहे. त्यांचे नॉमिनेशन आम्ही आज दाखल करीत आहोत. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही सर्व मिळून निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या सर्वच जागा जिंकून येतील, असा विश्वास यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

महाविकासआघाडीत कुठलेही मतभेद नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेसची या निवडणुकीबाबत काही नाराजी असली तर ती दूर करण्यात येईल. महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते अगदी गावपातळीवरील कार्यकर्तेसुद्धा ताकदीने ही निवडणूक लढणार आहेत. नागपुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर तर झाली. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अहीरकर यांनी विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीला दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप करीत आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी महाविकासआघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

भाजपचा गड, हा इतिहास झाला

पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे, असे जे सांगितले जाते. हा इतिहास झाला. आता आमचा उमेदवार जिंकेल, हे नक्की आहे. अभिजित वंजारी गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांचा संपर्क दांडगा आहे आणि महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते, कार्यकर्ते त्यांच्यासाठी ताकतीनिशी मैदानात उतरले आहेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com