
नागपूर : ‘आयआयएम’ नागपूरमुळे आत्मनिर्भर भारताची निर्मिती : राष्ट्रपती कोविंद
नागपूर - आयआयएम नागपूर विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रच नव्हे तर त्यांचे जीवन घडविणारे केंद्र ठरेल. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत प्रतिभेला फुलवितानाच नाविन्य आणि उद्योजकतेचे बीजारोपण करीत आत्मनिर्भर भारताची निर्मिती करेल, असा विश्वास रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. मिहान परिसरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर आयआयएमच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भिमराय मैत्री उपस्थित होते.
देशातील एक वर्ग ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था व डिजिटलल तंत्रज्ञानापासून दूर आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी जबाबदारीचा भाग म्हणून गावे दत्तक घ्यावीत, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ‘आयआयएम’सारख्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांनी आपल्या परिसरात नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता आणि डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलावीत. नवनवे संशोधन आणि उद्यमशीलतेला मोठ्या प्रोत्साहनामुळे विविध युनिकॉर्न किंवा स्टार्ट-अप्सने नवा इतिहास घडविला.व्यावसायिकतेच्या परिघात नवनवी क्षेत्रे येत असून अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. शिक्षण, आरोग्य अशा काही महत्वाच्या क्षेत्रात नविन उपक्रम सुरू झाले असून त्यातून रोजगार निर्मिती व महसूल प्राप्ती होणार आहे. हा बदल देशासाठी निश्चितच ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. या अनुषंगाने नागपूर आयआयएम विद्यार्थ्यांमध्ये रोजगार दाते होण्याची क्षमता विकसित करणारी परिसंस्था निर्माण करेल, असा विश्वासही कोविंद यांनी यावेळी व्यक्त केला. वंचितांच्या समस्या समजून घेण्यासाठी नव्या पीढीने नेतृत्व भावना जोपासून काम करावे.
सामाजिक उद्यमशीलता वाढत असून व्यावसायिक वर्तुळातील अनेकांनी याबाबत चांगला आदर्श घालून दिला आहे. समाजसेवी असणे हे चांगला व्यावसयिक असण्यासारखे आहे. नैतिकतेचा अभाव असलेला व्यवसाय म्हणजे जणू लुटीचा प्रकार आहे. या अनुषंगाने येथील संदर्भातही जाणिवेने अनुरूप बदल व्हावेत, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी आयआयएमच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन केले. त्यानंतर १३२ एकर क्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली. आयआयएम संचालन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी यांनी प्रास्ताविक केले.
नागपूर होणार ‘एज्युकेशन हब’ : नितीन गडकरी
नागपूर मेडीकल हब, लॉजिस्टीक हब म्हणून वेगाने विकसित होत आहे. भविष्यात आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाचे ‘एज्युकेशन हब’ म्हणून शहर विकसित होत असल्याचा अभिमान असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. विदर्भातील समृद्ध वने व खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी या संस्थेने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुर्गम भागातील शाळा दत्तक घ्या : धमेंद्र प्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या ज्ञान, अर्थ आणि नितीला अनुसरून या संस्थेची वाटचाल असावी, अशी अपेक्षा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली. आयआयएमएनने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालये दत्तक घेवून तेथील विकासाचे माध्यम व्हावे. विभागातील छोटे उद्योग, तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांसाठी आयआयएमने पुढाकार घेवून व्यवसाय सुलभतेचे मॉडेल तयार करावे, असे आवाहन केले.
राज्य सरकार सहकार्य करणार : सुभाष देसाई
आयआयएमएन मधून बुद्धिमान विद्यार्थी व साहसी उद्योजक निर्माण होतील, असा आत्मविश्वास व्यक्त करताना सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने आज एक महत्वाचे पाऊल पडत असल्याचे सांगितले. ही संस्था नागपूरसह राज्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नवभारताची कल्पना प्रत्यक्षात उतरवेल : देवेंद्र फडणवीस
नागपुरात उभी राहिलेली आयआयएमची वास्तू 'स्टेट ऑफ आर्ट दर्जाची' असून नवीन भारताचे स्वप्न साकारणारी आहे, असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. प्रशिक्षित मनुष्यबळ असेल तेथेच उद्योग येतात. त्यामुळे या परिसरात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू झाल्याने उद्योजकतेचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.