
परिचारिका दिन : कोरोनाच्या युद्धजन्य स्थितीत रुग्णसेवा हेच त्यांचे कर्तव्य
नागपूर : त्याग, सहनशक्ती, धैर्य या गुणांनी ओतप्रोत भरलेला, करुणेची किनार असलेला सेवाभावी व्यवसाय म्हणजे परिचर्या! कोरोना महामारीत (coronavirus) जगण्यामरणाच्या युद्धजन्य परिस्थितीत परिचारिका दिनाच्या (Hostess Day) पर्वावर रुग्णसेवेचा वसा सांभाळणाऱ्या चित्रा प्रमोद कुंभारे, पायल महल्ले-खडसे यांच्या आयुष्यातील वेदना ऐकल्यानंतर मात्र मातेपेक्षाही अधिक वात्सल्याने रुग्णांचे अश्रू टिपणाऱ्या परिचारिकांना सॅल्यूट करण्यासाठी हात वर जातात. (In Coronas warlike situation it is their duty to care for the sick)
दुसऱ्या महायुद्धात फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी सैनिकांची शुश्रूषा केली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त १२ मे परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. हे निमित्त साधून मेडिकल, मेयोतील कोविड वॉर्डातून सेवा देणाऱ्या परिचारिकांची संवाद साधला. त्यांनी ‘सकाळ’जवळ मन मोकळे केले. कोरोनाचा काळ म्हणजे जणू युद्धच.
रुग्णांना सांभाळण्याची चाळिशीतील पायल महल्ले खडसे यांची धडपड. मूळच्या यवतमाळच्या. लग्नानंतर नागपुरात आल्या आणि नियतीने घात केला. पती विवेक खडसे यांना पक्षघात झाला. १० वर्षांपासून अंथरुणाला खिळले होते. कोरोना दस्तक देणार, त्याच काळात त्यांचा मृत्यू झाला. दुःखातून सावरत कर्तव्य सांभाळण्यासाठी कोविड वॉर्डात ड्यूटी मिळाली. मात्र, ध्येयापासून त्या तसूभरही मागे हटल्या नाहीत.
पायल यांनी रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम सुरू आहे. मुलगा वेदांत आणि मुलगी चारू यांना सांभाळण्यासाठी आईला आणले. त्यांनाही कोरोना झाला. त्यांना खाट मिळाली नाही. अखेर आईवर घरीच उपचार सुरू ठेवले. घरी कोरोनाबाधित आई आणि मेडिकलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण अशी त्यांची दुहेरी कोरोनाशी लढत सेवा सुरू आहे.
आयसीयूत शिरलेल्या कुंभारे सिस्टर
चित्रा प्रमोद कुंभारे. मेयोतून निवृत्तीच्या वाटेवर. त्यांच्या सेवेला ३२ वर्षे झाले. नुकतेच मुंबईत नायर हॉस्पिटलमध्ये सिंलिडर गळतीतून आग लागली होती. त्यात अनेक रुग्णांचे जीव गेले. त्या घटनेची पुनरावृत्ती येथे झाली असती, परंतु मेयोच्या मेडिसीन आयसीयूत सिलिंडर गळतीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या चित्रा सिस्टर जिवाची पर्वा न करता आयसीयूत शिरल्या. आयसीयूत धूर पसरला होता. अशा स्थितीत चित्रा सिस्टर यांनी सिलिंडरचे बटन बंद केले. गळती थांबली आणि मोठी घटना टळली. त्यावेळी पंचेविसपेक्षा अधिक कोरोनाबाधित दाखल होते. ही वार्ता साऱ्यांना ठाऊक, मात्र बाहेर आली नाही. २५ वर्षे मेडिसीन आयसीयू सांभाळण्याचे आव्हान त्यांनी पेलवले. तर सद्या कोविड आयसीयूत त्यांची सेवा सुरू आहे.
परिचारिकांच्या अंतःकरणातील ममत्वाची भावना ही औषधापेक्षाही मोठे कार्य करते, असा नाईटिंगेल यांनी दिलेला संदेश परिचारिका रुग्णसेवेचा धर्म निभावतात. नकळत एखाद्या डॉक्टरकडून रुग्णसेवेत चूक झाल्याचे दिसून येताच तत्काळ चूक नजरेत आणून देण्याचे धाडसही परिचारिका करतात. त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, हीच अपेक्षा असते.- मालती डोंगरे, मेट्रन, मेयो
वैयक्तिक समस्यांशी झुंजत रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम परिचारिका सातत्याने करतात. अनारोग्याच्या अंधाऱ्या वाटेवर रुग्णसेवेचा दिवा हाती घेऊन चालणाऱ्या परिचारिका म्हणजे आधुनिक फ्लॉरेन्स नाईटिंगेल. आयुष्यात करुणामयी सेवेचे व्रत सांभाळणाऱ्या परिचारिकांच्या सेवेचे मोल समाजाने समजून घ्यावे. त्यांना गौरव नको आहे, परंतु सन्मानाचे जगणे हवे आहे.- वैशाली तायडे, मेट्रन, मेडिकल
(In Coronas warlike situation it is their duty to care for the sick)