esakal | संरक्षक भिंत नसल्याने पाणी आले वस्तीमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : संरक्षक भिंत नसल्याने पाणी आले वस्तीमध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नरसाळा परिसरातील नाल्यामुळे परिसर अतिशय गलिच्छ झाला आहे. नाल्याला संरक्षक भिंती नसल्याने वाहत येणारे पाणी आजूबाजूच्या मोकळ्या प्लॉटमध्ये शिरते. या साठून राहणाऱ्या पाण्यात अळ्या, डास आणि इतर किटक जमा झाले आहेत. यामुळे, स्थानिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नजरदेखील टाकावी वाटणार नाही, अशी परिस्थिती या परिसरात निर्माण झाली आहे.

छत्रपती चौक ते दिघोरी या मार्गाला लागून नरसाळा परिसर आहे. मुख्य मार्गावरील आशीर्वादनगर पासून पुरुषोत्तम थोटे कॉलेज ऑफ सोशल वर्ककडे हा नाला वाहत येतो. या तीन ते चार किलोमीटरच्या दरम्यान असणाऱ्या वस्त्यांमधील सांडपाणी या नाल्यामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे, बाराही महिने हा नाला या वस्त्यांमधील सर्व घाण घेऊन सतत वाहत असतो.

जुन्या काळातील नाला असल्याने त्याला संरक्षक भिंती नाही. तसेच, नाल्यावर त्या काळी बांधण्यात आलेले पूल देखील जीर्ण झाला आहे. अवजड वाहन या पुलावरून जाताना पुलाला हादरे बसतात. वाहनांमुळे पूल तुटतो की काय?’ असे प्रश्‍न ही दृश्‍य पाहताना येतात. शिवाय, नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यामध्ये ओसंडून वाहणाऱ्या या नाल्याचे पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे, पूल कुठे आणि नाला कुठे, असे प्रश्‍न पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्थानिक रहिवासी नाल्याच्या शेजारी कचरा टाकत असल्याने दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. हा नाला सिमेंटीकरणाद्वारे झाकावा, अशी मागणी त्रस्त रहिवाशांकडून करण्यात येते आहे.

हेही वाचा: 'विरोधी पक्षनेत्यांचा रोख आमच्याकडे, तर आमचा रोख केंद्राकडे'

नाल्याला सुरक्षा भिंत नसल्यामुळे, पाण्याचा मोठा लोंढा वाहून आल्यास पुलाच्या वरून पाणी वाहते. यामुळे, स्थानिकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. आमचा परिसर विधानसभा मतदार संघानुसार कामठीमध्ये तर महानगरपालिकेच्या हद्दीनुसार प्रभाग क्रमांक २९ मध्ये येतो. हद्दीच्या या वादामुळे काही प्रश्‍न लवकर मार्गी लागत नाहीत. लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला हवे.

-लोकेश कामडी, सामाजिक कार्यकर्ता, नरसाळा

दोन परिसराला जोडणारा हा नाल्यावरचा पूल आहे. भविष्यामध्ये रस्त्यावर भर पडल्यास याची उंची आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी होईल. पुराच्या वेळेस अंदाज न आल्यास कुणी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा पूल नव्याने पक्क्या स्वरूपामध्ये आणि संरक्षक भिंतीसह बांधायला हवा. आमदार किंवा नगरसेवकांनी निधी उपलब्ध करून देत पुलाचे काम लवकर करावे.

-गुरू माथने, रहिवासी, नरसाळा

हा जीर्ण पूल धोकादायक झाला आहे. मुख्य मार्गाला वस्तीशी जोडणारा हा पूल असल्याने रहिवाशांसाठी महत्त्वाचा आहे. दररोज अनेक वाहने यावरुन जातात. पुलाला कठडे देखील नाही. भर पावसात पुलावरून पाणी वाहत असल्याने गाडी चालविणाऱ्याला पूल दिसत नाही. परिसरामध्ये स्ट्रीट लाइट नसल्याने अनेकदा अपघात सुद्धा झाले आहेत. महापालिका प्रशासनाने याचे तातडीने नूतनीकरण करायला हवे.

-शुभम फाले, रहिवासी, नरसाळा

loading image
go to top