Nagpur : पहिल्या क्रिकेट सामन्याने भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

Nagpur : पहिल्या क्रिकेट सामन्याने भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला सुरुवात

नागपूर- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने भारतासाठी अतिशय महत्त्वाची असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची मालिका उद्या, गुरुवारपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर पहिल्या कसोटीने सुरू होत आहे.

कायमच ‘स्पोर्टिंग'' राहिलेली जामठाची खेळपट्टी यावेळी प्रचंड प्रमाणात फिरकीस साजेशी बनविण्यात आली असून तिचा नट्टापट्टा अजूनही सुरूच आहे. त्यामुळे पुढील चार किंवा पाच दिवस या खेळपट्टीचे नखरे दोन्ही संघाला झेलावे लागतील, असे चित्र आहे.

फिरकीस साजेशी बनविण्यात आलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांची कसोटी लागणार असून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारताला चारपैकी एकही सामना न गमाविता किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे.

त्यामुळे पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया फलंदाजांसाठी फिरकीचे जाळे विणण्यात आले आहे. मात्र, हे जाळे विणताना भारतीय फलंदाज खड्ड्यात पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. यासाठी भारताला आपली फलंदाजी अधिक बळकट करावी लागेल. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यास रोहित व राहुल किंवा गिल या जोडीला सुरुवातीचा एक तास संयमी खेळ करावा लागेल.

कारण थंड वातावरणामुळे पहिल्या एक तासात येथे वेगवान गोलंदाजांना मदत निश्चित मिळते. सलामीच्या जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली तर मधल्या फळीवर दबाव वाढणार नाही आणि एकप्रकारे वर्चस्वाची पायाभरणी होईल.

अंतिम अकराची डोकेदुखी

ज्याप्रमाणे खेळपट्टीची चर्चा होत आहे, त्याचप्रमाणे दोन्ही संघ अंतिम अकरा खेळाडूंची निवड कशी करतील, यावरही चर्चा होत आहे. डावखुरे फलंदाज ही ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब आहे, तर कुणाला वगळावे हा कठीण प्रश्न भारतापुढे आहे.

जोस हेझलवूड, मिचेल स्टार्क व कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाल्याने ऑस्ट्रेलियासाठी काम सोपे झाले आहे. कर्णधार कमिन्सच्या जोडीला स्कॉट बोलंड हा वेगवान गोलंदाज राहील हे जवळपास निश्चित झाले आहेत. फिरकीचे जाळे विणण्यासाठी नॅथन लायनच्या जोडीला ॲश्टन ॲगर किंवा टॉड मर्फी यांच्यापैकी एकाची निवड अपेक्षित आहे.

कर्णधार रोहित शर्मा व भारतीय संघ व्यवस्थापनाला अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील कारण सलामीसाठी रोहितसोबत शुभमन गिल की के. एल. राहुल,

तर ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या फलंदाजांना जाळ्यात अडकविण्यासाठी अश्विनसोबत जडेजा व कुलदीपला द्यायचे की अक्षर पटेलचाही समावेश करायचा हे धाडस निवड करताना करावे लागेल. गिलला स्थान दिल्यास के. एल. राहुल मधल्या फळीत खेळेल. सूर्यकुमारचे पदार्पण मात्र लांबणार आहे.

सामन्याची वेळ -

 • सकाळी ९.३० वाजतापासून

 • या मैदानावर भारत व ऑस्ट्रेलियाची कामगिरी

 • सर्वोच्च धावसंख्या

 • भारत ६ बाद ६१० डाव घोषित - श्रीलंकेविरुद्ध - २०१७

 • ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३५५ - भारताविरुद्ध २००८

 • सर्वोत्तम गोलंदाजी

 • जेसन क्रेझा ८-२१५ (भारताविरुद्ध - २००८)

 • आर. अश्विन ७-६६, (द.आफ्रिकेविरुद्ध - २०१५)

 • सर्वाधिक बळी

 • आर. अश्विन २३ (३ सामने)

 • जेसन क्रेझा १२ (१ सामना)

नाणेफेक महत्त्वाची

खेळपट्टी फिरकीसाठी नंदनवन आहे, हे आता स्पष्ट झाल्याने सामन्याचा निकालही लागणार असे मत सामन्याच्या आधीच व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारेल यात वाद नाही. आकडेवारीचा विचार केल्यास पॅट कमिन्सचे नशीब नाणेफेकीच्या बाबतीत त्याच्या बाजूने आहे.

गेल्या नऊ पैकी ८ कसोटीत त्याने कौल मिळविला आहे. प्रथम फलंदाजी करताना २५० धावा पुरेशा होतील, असे कमिन्सचे मत आहे व त्याने पत्रकार परिषदेत तसा अंदाजही व्यक्त केला. रोहित शर्मानेही आपल्या फलंदाजांना प्रतिआक्रमण करून धावा करा, असा सल्ला दिला आहे.