लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करणार 'इंटर मॉडेल हब'; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Inter model hub will start before elections said Nitin Gadkari in Nagpur
Inter model hub will start before elections said Nitin Gadkari in Nagpur

नागपूर ः देशातील पहिल्या इंटर मॉडेल स्टेशनच्या प्रारुपात फेरबदल करण्यात येत आहे. कॉनकॉर, सिंचन व आरोग्य विभाग, कारागृह, फुड कॉर्पोरेशनची जागा मिळविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. दोन महिन्यात सुधारित प्रकल्प अहवाल सादर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

देशात वाराणसी आणि नागपुरात इंटर मॉडेल हबची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिले इंटर मॉडेल स्टेशन उभारण्यात येत आहे. प्रकल्पासाठी रेल्वेने २०० एकर जागा दिली आहे. त्यातील ४४.५ एकर जागेवर इंटर मॉडेल स्टेशनची मुख्य इमारती राहतील. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत आहे. त्यासाठी अन्य शासकीय विभागाकडून अतिरिक्त जमीन घेण्यात येणार आहे अशी माहिती गडकरींनी दिली आहे. 

तसंच सुमारे ५०० ते ७०० हेक्टर परिसरात संपूर्ण परिसर असेल. एकाच ठिकाणी रेल्वे, मेट्रो, ब्रॉडगेज मेट्रो, बुलेट ट्रेनचा पर्याय उपलब्ध असेल. शिवाय महाराष्ट्र परिवहन महामंडळ, एमपी परिवहन आणि सीटी बसचे मुख्यालय या एकाच ठिकाणी असतील. यांना विमानतळही जोडले जाईल असं त्यांनी सांगितलं. 

पहिल्या टप्प्यात केंद्रीय परिवहन विभागाने १२०० कोटी रुपये प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत. कमर्शीयल डेव्हलपमेंटमधून निधी उभारून पुन्हा याच प्रकल्पाची गुंतवण्यात येईल. प्रथम रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत टाऊनशीप उभारली जाईल. नागनदीतून बोट चालविणे स्वप्नवत वाटत असले तरी पुनर्विकास प्रकल्पासाठी १७०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अंबाझरी ते पारडीदरम्यान बोट वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले.

प्रवासी व कॉर्गो हब वेगवेगळे

अजनीत प्रवासी वाहतुकीसाठी इंटर मॉडेल स्टेशन उभारण्यात येत आहे. तर, भविष्यातील कॉर्गो वाहतुकीची लक्षात घेऊन सिंधी रेल्वे येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट अंतर्गत लॉजेस्टिक हब उभारले जाईल. शहरात होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी कॉनकॉरला ड्रायपोर्टमंध्ये दुप्पट जागा दिली जाईल.

स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्तीवर भर

स्वच्छ, सुंदर व प्रदुषणमुक्त नागपूर वर भर आहे. झाडे वाचविण्याच्या दृष्टीने डिझाईन बदलण्यात येत आहे. अत्यावश्यक असेल तिच झाडे काढून याच भागात प्रत्यारोपित करण्यात येतील. प्रकल्पास्थळी सीएनजी किंवा विजेवर चालणारीच उपकरणे वापरली जातील. त्यासाठी संबंधित कंपनीसोबत चर्चाही केली आहे.

या प्रकल्पाच्या ठळक बाबी 

दररोज ५ लाख प्रवासी लाभ घेतील.
थेट १० हजार युवकांना रोजगार.
प्रगत देशांप्रमाणेच किफायतशीर हॉटेल, लॉज, हॉलची निर्मिती.
पार्किंगसह वैद्यकीय सुविधा.
सीएनजी, बायोडिझल पंपांसह इलेक्ट्रिक चार्जींग सुविधाही.
वाहने सिग्नलवर न थांबता पुढे जातील.
अजनीतील ब्रिटीशकालीन पुलाच्या जागेवर केबलआधारित नावा पूल.
अमरावती, गोंदिया, वडसा, छिंदवाडा, बैतूलपर्यंत ब्रॉडगेज मेट्रोचा विस्तार.
मेट्रो परिचालनात विदर्भातील युवकांना प्राधान्य, कर्जही देणार.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com