

नागपूर : महाज्योतीने (Mahajyoti) ऐनवेळी मुलाखती रद्द केल्यामुळे इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांना (OBC Student) आर्थिक फटका बसला आहे. तसेच त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या नियोजन शून्य गैरकारभार करणाऱ्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक प्रदिप डांगे यांची तत्काळ महाज्योतीमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांनी केली.
विविध विद्यापीठांमध्ये पीएचडीसाठी पूर्ण वेळ संशोधन करणाऱ्या ओबीसी भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी अशी मागणी होत आहे. व्यवस्थापकीय संचालक डांगे यांचा ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनांपासून डावलण्याचा डाव आहे. तर दुसरीकडे पाच ते सहा महिन्यापासून संचालक मंडळाची सभाही बोलाविली नाही. शेवटी विद्यार्थी त्यांना कायदा व शासन निर्णयाप्रमाणे पीएचडीसाठी फेलोशिपसाठी आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी जाहिरात काढली. मात्र, त्यातही त्रुटी आणि चुका ठेवल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करावे लागले.
ओबीसी भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी महाज्योतीची स्थापन केली आहे. महाराष्ट्र शासनाची ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेवर शासनाने तीन अशासकीय तज्ञ संचालकांची नेमणूक केली. पण कायद्यात तरतूद असताना स्वतंत्र अध्यक्षांची नेमणूक करण्याऐवजी, इतर मागास विभागाचे मंत्री यांनी, स्वतंत्र अध्यक्षाची निवड होईपर्यंत या विभागाचे मंत्री अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील, अशी अट टाकली आहे. त्यामुळे महाज्योतीचे अध्यक्षपद मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडेच आहे. गेल्या वर्षभरात महाज्योतीला स्वतंत्र अध्यक्ष नेमण्यासाठी मंत्र्यांना व विभागाला मुहूर्त मिळालेला नाही. तसेच भंडारा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त कारभार दिला आहे. नागपुरातील कार्यालयाचा कार्यालयाचे कारभार २०० किलो मिटर अंतरावर बसलेल्या अधिकाऱ्याकडे दिल्याने नाराजी आहे.
३१ मे २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ओबीसी व भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना बार्टी व सारथीप्रमाणे पीएचडीसाठी फेलोशिप प्रति महिना ३१ हजार रुपये देण्यात यावी असा निर्णय घेतला. त्यासाठी ५०० विद्यार्थी संख्याही निश्चित झाली.त्यानुसार अनेकांनी अर्जही केले.
संचालक मंडळाला अंधारात ठेवून, महाज्योतीकडे फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या राज्यातील कोकण, कोल्हापूर, पुणे मुंबईपासूनच्या सहाशे विद्यार्थ्यांची २४ ऑगस्टपासून २६ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे तपासणी नागपूर महाज्योती कार्यालयात होणार होती. त्यासाठी त्यांना बोलविले होते. अचानकच सोमवारी २३ ऑगस्टला सांयकाळी चार वाजता कागदपत्रे तपासणीच्या मुलाखती रद्द केल्याने अर्जदारांना कळविण्यात आले. त्यामुळे अनेकांना प्रवासातच असताना धक्का बसला. परिणामी आर्थिक नुकसानीसह अनेकांना मनस्ताप झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन देणार असल्याचेही प्रा. गमे व वडले यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.