
सावधान नागपुरकरांनो, इराणी टोळी नागपुरात सक्रिय!
नागपूर : पोलिस असल्याची बतावणी करीत शहरातील पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच जणांना गंडा घालणारे भामटे इराणी टोळीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत पाचही पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून त्यासाठी गुन्हे शाखा आणि पाचही परिमंडळाद्वारे सयुंक्त मोहीम चालविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शहरातील अंबाझरी, कोतवाली, बेलतरोडी, एमआयडीसी परिसरात वृद्धांना पोलिस असल्याची बतावणी करीत, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने नजर चुकवून लंपास करण्याच्या घटना बुधवारी घडल्या. सकाळी अवघ्या दोन तासात या घटनांना पार
पाडणाऱ्या युवकांचा पोलिस कसून शोध घेत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी यांनी दिली. पोलिसांना त्यांचा वाहन क्रमांक मिळाला असून त्याआधारावर शहर आणि शहराबाहेर त्यांच्या शोध घेणे असल्याचे ते म्हणाले. दरम्यान या गुन्ह्यांमागे शहरात इराणी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुन्हे करताना, त्यांनी वापरलेली पद्धत तशीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारांवर नजर
शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांसंदर्भात पोलिसांकडून आता संचित रजा पॅरोल आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींवर नजर ठेवण्यात येणार आहे. हे गुन्हेगार कुठे आहेत, त्यांच्या काय कारवाया सुरू आहे, याची माहितीही पोलिस घेणार आहे.
विशेष पथकांची निर्मिती
साधारणतः शहरात एका वर्षांपूर्वी आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्यात या घटनांमध्ये धडधाकट पुरुष अशाच प्रकारे नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करीत, त्यांना गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटतात. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून शहर, राज्य आणि राज्याबाहेरही त्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे ते म्हणाले. विशेषतः ही टोळी श्रीरामपूर, पुणे, ठाणे आणि कल्याण या भागातील असल्याने तिथेही पथक पाठविण्यात येणार आहे.
Web Title: Iranian Gang Active In Nagpur Police Information Cctv Footage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..