
कन्हान नदीत तिघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दोघे बेपत्ता
मौदा (जि. नागपूर) : तालुक्यातील वढना गावाजवळील कन्हान नदीच्या पात्रात पोहायला गेलेले तीन तरुण बुडाले. ही घटना शनिवारी (ता. २७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यातील एका तरुणाचा मृतदेह सापडला असून, दोघे अजून बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वामिनारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमाननगर येथील शाळेतील शिक्षक व कर्मचारी मौदा तालुक्यातील वढना येथील स्वामिनारायण गोशाळेत पिकनिकसाठी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आले. गोशाळेला लागून कन्हान नदी आहे. १० तरुण पोहोयसाठी ५ वाजताच्या सुमारास नदीवर पोहोचले. सर्वांनी नदीत उडी घेतली. परंतु, त्यापैकी तिघे खोल पाण्यात गेल्याने बुडाले.
प्रशांत राजाभाई पटेल (वय २३, रा. नागपूर, मूळ गाव तितलागड, ओडिशा) याचा मृतदेह सापडला आहे. अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (वय २१, रा. नागपूर, मूळ गाव गौजुल, गुजरात), हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (वय २८, रा. नागपूर, मूळ गाव अहमदाबाद, गुजरात) यांचे शोधकार्य बातमी लिहीपर्यंत सुरू होते.
घटनास्थळी मौदा-कामठी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, मौदा तहसीलदार मलिक विराणी, उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्तार बागवान, मौदा पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे दाखल झाले होते. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्तार बागवान व पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.