
निवडणुकीसाठी भाजपची ‘सर्जिकल बैठक’
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायतची निवडणूक (Election) २१ डिसेंबरला होणार आहे. रणनीती आखण्यासाठी पंचवटी येथील आमदार समीर मेघे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप (Bjp) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ‘सर्जिकल बैठक’ (Meeting) पार पडली. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे मागविण्यात आली. ४ डिसेंबरला पक्षातर्फे उमेदवारांची अंतिम यादी घोषित (Names of candidates requested) केली जाणार आहे.
याप्रसंगी भाजप आमदार समीर मेघे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, भाजप हिंगणा मंडळ अध्यक्ष धनराज आष्टनकर यांच्यासह नगरपंचायतीमधील नगरसेवक व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. नगरपंचायतीमध्ये वॉर्डाची संख्या १७ आहे. दोन ते तीन वॉर्ड वगळता इतर वॉर्डात इच्छुकांची नावे चार ते पाच आल्याचे समजते.
नगराध्यक्षांच्या वार्डात एकच नाव आल्याची चर्चा सुरू आहे. चार ते पाच इच्छुकांची नावे आल्याने उमेदवारी मागणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर ४ डिसेंबर रोजी भाजपकडून अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी घोषित केली जाणार आहे. काही नगरसेवकांनी घरच्या महिला मंडळाचे नाव वॉर्डात दिले असून इतर वॉर्डातही उमेदवारी मिळावी, यासाठीसुद्धा नाव दिल्याचे बोलले जात आहे.
दोन ते तीन वॉर्डात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पक्षाकडून एका उमेदवाराला एकाच वॉर्डात उमेदवारी देण्याचे धोरण निश्चित केल्याचे समजते. भाजप नगरसेवक डॉ. अजय पारधी यांनी जागेश्वरपुरी मधील तीन वॉर्डांतील जागा देण्यात याव्या, अशी मागणी पक्षाकडे केल्याचे समजते. त्यांनी स्वतःसाठी एका वॉर्डात उमेदवारी मागितली आहे.
स्वीकृत नगरसेवक शिरीष देशमुख यांनीही आपल्या वॉर्डाव्यतिरिक्त इतर एका वॉर्डात उमेदवारी मागितली आहे. भाजप जिल्हामंत्री विशाल भोसले यांनीही उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये नाव दिले आहे. भाजयुमो शहराध्यक्ष पंकज गजबे यांनीही जागेश्वरपुरी मध्ये उमेदवारीसाठी नाव दिले आहे. पक्षाच्या धोरणानुसार याबाबत अंतिम निर्णय काय होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी गटनेते अजय बुधे यांचा वॉर्ड सुरक्षित आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर यातील काही नगरसेवक वेगळी भूमिका घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.