One Teacher Handles Classes for 90 Students at Kodamendhi Junior College
esakal
कोदामेंढी: अकरावीत ५१ विद्यार्थी आणि बारावीत ३९. एकूण ९० पटसंख्या. दोन्ही वर्गांसाठी शिक्षक मात्र एकच. गेल्या आठ वर्षांपासून दोन्ही वर्गांना एकच व्याख्याता शिकवितात. नागपूर जिल्हा परिषदेच्या मौदा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या कोदामेंढी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे.
चंदा जाधव हे येथील एकमेव शिक्षिकेचे नाव. त्या कनिष्ठ व्याख्याता आहेत. ११ वाजता त्या बारावीचा इंग्रजीचा पिरिएड घेतात. तो ११.४५ पर्यंत चालतो. त्यानंतर त्या अकरावीच्या वर्गात जातात. तिथे १२.२० पर्यंत मराठीचा पिरिएड घेतात. १० मिनिटांच्या ब्रेकनंतर १२.३० ला पुन्हा बारावीच्या वर्गात येतात. तिथे मराठी शिकवितात. एक वाजता पुन्हा अकरावीच्या वर्गात येतात. तिथे १.३० पर्यंत इंग्रजी शिकवितात. नंतर अर्धा तास जेवणासाठी ब्रेक.