‘मविआ’ला निवडणुकांसाठी उमेदवारही मिळणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar
Bawankule

‘मविआ’ला निवडणुकांसाठी उमेदवारही मिळणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : भाजपमध्ये आगामी काळात महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांचा प्रवेश होणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत त्यांना उमेदवारही मिळणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गुरुवारी (ता. २९) येथे केला. कोरोनाकाळात लागू असलेल्या लॉकडाउनचे आदेश झुगारून मोर्चा काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी श्री. बावनकुळे अमरावतीला आले होते. न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘मविआ सरकारच्या काळात ज्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही, ते आता भाजपमध्ये येत आहेत. आगामी काळात आघाडीतील मोठ्या नेत्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे आघाडीत कुणी शिल्लक राहणार नाही. तत्कालीन आघाडी सरकारने वैधानिक मंडळे बंद करून विकास थांबविला होता. ती मंडळे आमच्या सरकारने पुन्हा सुरू केल्याने विकासाचा अनुशेष भरून निघेल. कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नेते दोन सरकारमध्ये तुलना करीत असून भाजपमध्ये त्यामुळे ‘इनकमिंग’ वाढले आहे.

शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी असून ते अस्वस्थ आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी विस्तार केव्हा होईल, या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांच्यासंदर्भातही बोलण्यास त्यांनी नकार दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे.

भाजपची काय तयारी आहे, यावर बोलताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा दाखला देत श्री. बावनकुळे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला ५१ टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळतील. लोकसभेच्या निवडणुकीत ४५ व विधानसभेत २०० पेक्षा अधिक जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीला संपविण्याचे काम थेट बारामतीमधून सुरू झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मविआतील काही नेते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची ईडीमार्फत होणारी चौकशी का थांबली, यावरही स्पष्ट बोलण्याचे टाळत ते म्हणाले की, ईडी स्वतंत्र यंत्रणा आहे. तेच निर्णय घेतात.