महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातला जाणारच, वडेट्टीवार-मुनगंटीवारांच्या विरोधाचं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

13 elephants from Maharashtra to go to Gujarat central government Tadoba-Andhari project nagpur
महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातला जाणारच, वडेट्टीवार-मुनगंटीवारांच्या विरोधाचं काय?

महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातला जाणारच, वडेट्टीवार-मुनगंटीवारांच्या विरोधाचं काय?

नागपूर : ताडोबा-अंधारी प्रकल्पासह गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर व पातानील येथील एकूण १३ हत्ती गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच हे सर्वच हत्ती जामनगरला रवाना होणार आहेत. तेथे उभारण्यात येत असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कमलापूर येथील आठ हत्तींपैकी चार सुदृढ हत्तींसाठी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळासाठी नवीन सोयीसुविधा राधे क्रिष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडून निर्माण करण्यात येणार आहेत. या ट्रस्टने कमलापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे व्यवस्थापन करण्याचे मान्य केले आहे. तसेच सर्व खर्च ट्रस्टकडून करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे स्थानिक गावकऱ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कमलापूर येथील चार सुदृढ हत्तींशिवाय कमलापूर, पातानील व ताडोबा येथील वयोवृद्ध, अप्रशिक्षित व लहान पिल्ले असे एकूण १३ हत्ती पाठविण्यात येणार आहेत. या हत्तींचे स्वास्‍थ्य व उच्च दर्जाच्या वैद्यकीय देखरेखीसाठी प्रशिक्षित व अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उपचाराची सोय व उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी, राहण्यासाठी प्रशस्त जागा असलेल्या जामनगरस्थित राधे क्रिष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट येथे पाठविण्यात येत आहे. त्यांना यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर केला जाणार नाही. प्राणिसंग्रहालयाप्रमाणे कोठेही प्रदर्शितही करण्यात येणार नाही.

वन विभागाने हे हत्ती जामनगर येथे पाठविण्यासाठी केंद्र शासनाकडून नाहरकत पत्र प्राप्त केले आहे. या सर्व हत्तींची ट्रस्टकडून काळजी घेण्यात येणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनसंरक्षक युवराज एस. यांनी कळविले आहे.

हत्ती स्थलांतरणाला विरोध

केंद्र सरकारने कमलापूर आणि ताडोबा येथील हत्तीला जामनगर येथे नेण्यासाठी परवानगी दिल्याने आता वन्यप्रेमी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे वन्यजीवप्रेमी विरुद्ध वनविभागाचे कर्मचारी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण हा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) या कार्यालयाने केंद्र सरकारकडे पाठविल्यानंतर सर्व स्तरातून विरोध झाला होता. मंत्री विजय वडट्टेवार यांनीही विरोध केला होता. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही हत्ती राज्याच्या बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

Web Title: Maharashtra Elephants Go To Gujarat Wadettiwar Mungantiwar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top